facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / राहुरीत मतदारांनी नाकारले ‘परिवर्तन’

राहुरीत मतदारांनी नाकारले ‘परिवर्तन’

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी नगरपालिका प्रत्येकवेळी तनपुरे यांच्याच ताब्यात का जाते, हा प्रश्न त्यांच्या विरोधकांना पुन्हा एकदा पडला आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, तनपुरे यांच्यावर करण्यात आलेली खालच्या पातळीवरील टीका या गोष्टी विरोधकांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे आता तरी विरोधकांनी कोणत्याही आवेशात न राहता आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच राहुरी पालिका निवडणुकीचा निकाल लागला. त्यात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या जनविकास आघाडीला स्पष्ट बहुमतासह नगराध्यक्षपदही प्राजक्त तनपुरे यांच्या निमित्ताने तनपुरे कुटुंबाकडे आले. याआधीही जनतेतून झालेल्या निवडीत नगराध्यक्षपद डॉ. उषा तनपुरे यांना मिळाले होते. वेळोवेळी असे का होते, याबाबत विरोधकांकडून आत्मपरीक्षण निवडणुकीनंतर केले जात नाही. राज्यात बहुतांश ठिकाणी राजकीय पक्षांनी एकला चलो रेची भूमिका अंगिकारली; मात्र, राहुरीत तनपुरे यांचा पराभव करायचा असेल तर कितीही मतभेद असले तरी एकत्र यावे लागेल, अशीच रचना करण्यात आली आणि तेथेच घात झाला. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी एकत्र येत परिवर्तन नावाने मोट बांधली. प्रचारामध्ये विखे यांनी तनपुरे यांच्यावर टीका करताना पातळी सोडली नाही; मात्र, आमदार कर्डिले यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषेचा आधार घेत टीका केली. यामुळे सभेत टाळ्या मिळाल्या असल्या तरी याच टाळ्या महागात पडल्याने परिवर्तन मंडळाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रावसाहेब यादवराव तनपुरे यांना पराभव पत्कारावा लागला. दस्तुरखुद्द तालुक्यातील तनपुरे नावाच्या नागरिकांच्या तीव्र नाराजीचे पडसाद मतदान रूपाने उमटले, यात रावसाहेब तनपुरे यांचा राजकीय बळी गेला.

सत्ताधारी मंडळाने केलेली विकासकामे व पुढे काय करणार, याचे व्हिजन यावर जोर दिला. या उलट विरोधी मंडळाला तनपुरे यांना लक्ष्य करण्याच्या नादात मतदार कधी दुरावत गेले याचे भान राहिले नाही. नगराध्यक्षपदासाठी बहुजन आघाडीकडून मुस्लिम समाजाचे अब्दुल आतार मते घेतील व मतविभागणीत फायदा होईल, असा होरा परिवर्तन मंडळाचा होता तो पुरता फसला. आतार यांना केवळ दोन हजार मते मिळाली. माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. उषा तनपुरे यांच्यावर भूखंड, व्यापारी गाळे याबाबत गंभीर आरोप कर्डिले यांनी केले. पिण्याचे पाणी जपून वापरावे या तनपुरे यांच्या अावाहनाची खिल्ली उडविण्यात आल्याने सुशिक्षित मतदारांनी मतदानातून उत्तर दिले. परिवर्तन होईल या आशेवर नेते कार्यकर्ते विसंबून राहिले, प्रत्यक्षात मात्र उलटे चित्र समोर आले. संयमी प्रचार, विराधकांच्या शिवराळ भाषेला विकासात्मक उत्तरे देण्यास प्राधान्य दिल्याने मतदारांनी जनविकासला कौल दिला.

डॉ. उषा तनपुरे यांना टीकेचे लक्ष्य केल्याने महिलांनी मतांच्या रूपाने तनपुरे यांना अधिकचे बळ दिले. विरोधकांचीही कामे अडविली नाही ही त्यांची जमेची बाजू ठरली. शहरवासियांनी तनपुरे यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले.

राहुरीत गळ्यात गळा तर अवघ्या पंधरा किमीवर असलेल्या देवळाली प्रवराच्या निवडणुकीत ऐकमेकांच्या विरोधात यामुळे एकीचे बळ नावापुरतेच राहिले. अभद्र युती झाल्याने निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देता आली. परिवर्तन मंडळाला अवघ्या सहा जागा मिळाल्या त्याचीही वाटणी करण्यात आली. यात विखे व कर्डिले यांना प्रत्येकी तीन जागा पदरात पडल्या. विखारी प्रचार अंगलट आला, अशी कबुली कार्यकर्ते देऊ लागले. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे, आमदार कर्डिले, डॉ. सुजय विखे यांनी एकत्र येत तनपुरे यांना आव्हान दिले; परंतु, मतदारांनी थारा दिला नाही.

अनेक वर्षांपासून नियोजनबद्ध विकासकामांची मालिका शहरवासियांपुढे ठेवल्याने त्याचाही फायदा तनपुरे यांना झाला. शहराला लागू असलेली पूररेषा तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून शिथिल करून आणून विकासाचा अडलेला गाडा वेगाने धावला. पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची कामे पूर्ण झाल्याने शहराचा चेहरामोहरा बदलला. राहाता पालिकेने शंभर कोटींची विकास कामे केली; मात्र, राहुरी आहे तशीच असल्याचा आरोप झाला त्यास मतदानातून प्रतिसाद मिळाला नाही, या उलट विखे यांच्या ताब्यातून राहाता पालिका गेली. बाह्यशक्तींचा शिरकाव शहरात होऊ नये, अशी धारणा होती. त्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले.

डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत विखे-कर्डिले यांनी बाजी मारल्याने पालिका जड नाही, या आवेशात परिवर्तनची स्थापना झाली असली तरी तनपुरे यांनी डाळ शिजू दिली नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना आता अधिक सतर्क रहावे लागेल. तनपुरेंचा विजय ही राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी मानली जात आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *