facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / पुलांमुळे खोळंबा; प्रवासी वैतागले
news-16

पुलांमुळे खोळंबा; प्रवासी वैतागले

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – कन्नड-सिल्लोड मोढा फाटा रस्त्यावरील पूल यंदाच्या पावसाळ्यात कोसळला. त्यानंतर टापरगाव (ता. कन्नड) येथील पुलासही तडे गेले. महाड दुर्घटनेनंतर राज्यात अन्यत्र खबरदारी घेण्यात आल्याने टापरगाव पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पुढील तीन महिने हा रस्ता जड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मोढा फाट्याजवळ पर्यायी रस्ता नसल्याने सिल्लोड-कन्नड वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून कधी सुटका होणार, असा प्रश्न कायम आहे. टापरगाव पुलाची दुरुस्ती सुरू झाली असून, मोढा फाटा पुलाची निविदा अंतिम टप्प्यात आहे.
सिल्लोड-कन्नड रस्त्यावर भराडी जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत मोढा फाटा येथील पूल पाच सप्टेंबर रोजी दुपारी अचानक कोसळला. ४० वर्षे जुना हा पूल पडून चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर झाला होता. दरम्यान, दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल बांधण्यासाठी विभागातर्फे हालचाली करण्यात आल्या. सर्वेक्षणानंतर नवीन पूल बांधण्याचा निर्णय झाला. त्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच पुलाचे काम सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार यांनी सांगितले, की हा पूल लवकरात लवकर उभा राहावा, या दृष्टीने बांधकाम तातडीने सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुलाशेजारून पर्यायी रस्ता करण्यासंदर्भातही सुचविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग २११ सोलापूर-धुळे रस्त्यावर टापरगाव (ता.कन्नड) येथील निजामकालीन पुलासही तडे गेल्याचे तपासणीतून उघड झाले होते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे जाहीर केले. तीन महिने हे काम चालणार आहे. तोपर्यंत या रस्त्यावरून धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक मालेगावमार्गे वळविण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. बसही या मार्गे वळविल्याने १७ किलोमीटरचा फेरा वाढला असून नागरिकांचा वेळ वाया जात आहे.

पाण्यामुळे पर्यायी मार्ग अशक्य
नदीला पाणी असल्याने पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करणे शक्य नाही. आणखी महिनाभर तरी हे पाणी हलणार नाही तोवर एसटी तसेच जड वाहतूक मालेगाव मार्गेच राहील, असे एनएचएआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *