facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन

आवाज न्यूज नेटवर्क –  देशाच्या आणि तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि सर्वांच्या लाडक्या ‘अम्मा’ जयललिता यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांनी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतीय राजकारणात गेली तीन दशके घोंगावणारं वादळ शांत झालं. जयललिता यांच्या निधनानंतर अपोलो रुग्णालयासह संपुर्ण तामिळनाडूत प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

प्रकृती अस्वस्थामुळे जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. हे उपचार सुरु असतानाच त्यांना रुग्णालयातच ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या पथकासह लंडन येथील डॉक्टर रिचर्ड बेल यांनाही अपोलो रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आज दुपारी डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन जयललिता यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे जाहिर केले.

दोन वर्षाची असताना वडील गेले

कर्नाटकातील मैसूर येथे अय्यर कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्या दोन वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटूंबाला गरिबीचे चटके सहन करावे लागले. त्यामुळे जयललिता यांच्या आई बंगलोरला आई-वडीलांच्या घरी आल्या. त्यानंतर जयललिता यांच्या आईने तामिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

वकील व्हायचे होते

जयललिता या अभ्यासात हुशार होत्या. गरिबीचे चटके सोसतच त्यांनी आधी बंगलोर आणि नंतर चेन्नईत शिक्षण घेतले.चेन्नईच्या स्टेला मॉरिस कॉलेजातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविली होती. त्यांना वकील व्हायचे होते.

१५ व्या वर्षी सिनेमात पदार्पण

वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी सिने कारकिर्दीला सुरुवात केली. एका निर्मात्याच्या आग्रहावरुन त्यांनी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी एपिसल या इंग्रजी चित्रपटात मुख्य भुमिका साकारली आणि तिथून त्यांच्या फिल्मी करियरला सुरुवात झाली.

३०० चित्रपटात भुमिका

कन्नड, तमिल,इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे ३०० चित्रपटात त्यांनी काम केले. ‘चिन्नाडा गोम्बे’ हा कन्नड भाषेतील त्यांचा पहिला चित्रपट होता. चित्रपटात स्कर्ट परिधान करणाऱ्या त्या पहिल्या तमिळ अभिनेत्री होत. २० वर्षाच्या आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी ‘इज्जत’ या एकमेव हिंदी चित्रपटात काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र त्यांचे नायक होते.

एमजींसोबत राजकारणात प्रवेश

१९८२ मध्ये जयललिता यांनी एमजी.रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील अन्ना द्रमुकमध्ये प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यावर पक्षाच्या प्रचार सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली. नंतर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत त्या विजयी झाल्या आणि त्यांच्या संसदीय राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर १९८४ ते १९८९ दरम्यान त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. १९८४ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रामचंद्रन यांनी त्यांना पक्षातील उपनेते पदावरुन काढून टाकले.१९८७ मध्ये एमजी.रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता यांनी स्वत:ला रामचंद्रन यांचे उत्तराधिकारी घोषित केले. १९८९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत २७ जागा जिंकून जयललिता यांचा पक्ष विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला. १९९१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबरोबर युती करुन त्यांनी सरकार बनविले.

सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री

२४ जून १९९१ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तामिळनाडूतील सर्वात कमी वयाच्या त्या मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांनी मिळविला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *