facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘देवबाभळी’ने कोरले विजेतेपदावर नाव

‘देवबाभळी’ने कोरले विजेतेपदावर नाव

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – थिएटर अॅकॅडमीतर्फे आयोजित रंगसंगीत संगीत एकांकिका स्पर्धेत नाशिकच्या ‘देवबाभळी’ या एकांकिकेने बाजी मारून स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुण्याच्या ‘संगीत विठूरंग’ या एकांकिकेने द्वितीय, तर नाशिकच्या संगीत फुगडी या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

रविवारी स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडली. राज्यभरातील केंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या प्रथमिक फेऱ्यांतून सात संगीत एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकच्या देवबाभळी या एकांकिकेने बाजी मारली. ‘संत तुकाराम महाराजांची सहचारिणी आवली त्यांच्यासाठी जेवण घेऊन जात असताना तिच्या पायात बाभळीचा काटा घुसतो. गरोदर असलेल्या आवलीच्या पायातील काटा साक्षात रखुमाई काढते. या सगळ्यासाठी आवली पांडुरंगाला दोष देते. रखुमाई मात्र तिची समजूत घालते,’ अशा कथेवर आधारलेली ही एकांकिका होती. शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारून आपल्या गोड गळ्याने सर्वांची मने जिंकली. तिला गायक अभिनेत्रीच्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या ‘संगीत विठूरंग’ या एकांकिकेमध्ये ‘कलाकाराचे दैवत म्हणजे त्याची कलाच,’ असा संदेश देण्यात आला. कलावंतांना समाजात दुय्यम ठरवले जाते; मात्र इतरांच्या आनंदासाठी ते कायम झटतात, याचा प्रत्यय या एकांकिकेतून आला. आशुतोष मुंगळे या कलाकाराने उत्कृष्ट गाण्यांचे आणि अभिनयाचे सादरीकरण केले. या नाटकात लिहिलेल्या संवादांना रसिकांनी भरभरून दाद दिली. अक्षय जोशी याने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेता जितेंद्र जोशी व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माधुरी पुरंदरे, अतुल परचुरे, विजय केंकरे, ‘थिएटर अॅकॅडमी’चे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे, उपाध्यक्ष सागर अत्रे आदी उपस्थित होते. अभिनेत्री विभावरी देशपांडे, उदय लागू आणि श्रीराम पेंडसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष होते. गद्य विभागात ‘खटारा’ची बाजी

तीन डिसेंबर रोजी भरत नाट्य मंदिरात पार पडलेल्या रंगसंगीत स्पर्धेच्या गद्य विभागाच्या अंतिम फेरीत अहमदनगरच्या ‘खटारा’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. पुण्याच्या ‘दी क्युरियस केस ऑफ’ या एकांकिकेने द्वितीय, तर ‘बीएमसीसी, पुणे’च्या ‘बाई’ या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. मुंबईच्या ‘ओवी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक/तांत्रिक एकांकिकाचा पुरस्कार देण्यात आला. नीलिमा कुलकर्णी, सुबोध राजगुरू व अनिरुद्ध खुटवड यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *