facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / किरकोळ व्यवहारही ‘कॅशलेस’

किरकोळ व्यवहारही ‘कॅशलेस’

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – मॉलमध्ये जाऊन अथवा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये जाऊन खरेदी केल्यानंतर डेबिट अथवा क्रेडिट कार्ड स्वाइप करून पेमेंट करणे ग्राहकांना सोयीस्कर ठरते. त्यामुळेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर मॉल अथवा कॅशलेस पेमेंटची सुविधा असणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. परंतु कॅशलेस पेमेंटची सुविधा नसल्यामुळे छोट्या विक्रेत्यांचे व्यवहार थंडावले होते. त्यामुळेच आता नोटाबंदीच्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी छोटे विक्रेतेही पुढे आले असून त्यांनीही कॅशलेस पेमेंट सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिलाय.
नोटाबंदीच्या समस्येला सामोरे जात असतानाच शहरामध्ये चलन टंचाई निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट किरकोळ विक्रेत्यांवर झाला. किरकोळ विक्रेत्यांकडे सुट्ट्या पैशांची अडचण येत असल्याने ग्राहकांनी तेथे खरेदी करण्यास पाठ फिरवली. त्यामुळे आता हे दुकानदार देखील आपल्या दुकानांमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आघाडीवर असून यामध्ये पानटपरी चालकापासून ते चहाविक्रेतेही मागे राहिले नाहीत.
शहरातील मुख्य बँकांमध्ये आरबीआय कडून चलन उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या बँकांनी देखील पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना कमीतकमी पैसे देण्यावर भर दिलाय. एटीएम सेंटरमधून देखील केवळ दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्याने या नोटा खर्च करायच्या कशा, असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. त्यामुळेच नोटाबंदीचा परिणाम आता चहाविक्रेते, पानटपरी चालक, फळविक्रेते, वडापाव विक्रेते, अशा छोट्या विक्रेत्यांवर होऊ लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून यासर्वांच्या विक्रीवर जवळपास ३० ते ४० टक्के परिणाम झाला असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. मात्र, आपल्या व्यवहाराला जास्त फटका बसू नये, यामुळे या विक्रेत्यांनी सुद्धा कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे या सुविधा सुरु झाल्यामुळे ग्राहकांच्या संख्येमध्येही वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. दरम्यान, कॅशलेस सुविधा देणाऱ्या कंपनीकडे अद्यापही अनेक दुकानदारांनी मशीनसाठी अर्ज केले असून यासर्वांची मागणी पुढील सात ते आठ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित कंपनीतून सांगण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *