facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / देशभरातील वैद्यकीय शिक्षक ‘एमसीआय’च्या रडारवर

देशभरातील वैद्यकीय शिक्षक ‘एमसीआय’च्या रडारवर

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – देशभरातील शासकीय व खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील वैद्यकीय शिक्षक भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) रडावर आले असून, सर्वच कॉलेजांमधील अधिष्ठातांपासून ते अगदी सहाय्यक प्राध्यापकांपर्यंतच्या सर्वच वैद्यकीय शिक्षकांची बायोमेट्रिक नोंद परिषदेला जोडली जाणार आहे. परिणामी, दांड्या मारणारे वैद्यकीय शिक्षक अडचणीत येणार असून ‘एमसीआय’च्या तपासणीदरम्यान होणाऱ्या उसनवारीसारख्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. देशभरात कुठल्या विषयामध्ये किती प्राध्यापक आहेत, असा सगळा ‘डेटा’ही आपसुकच तयार होणार आहे.

निरीक्षणावेळी एका शहराच्या कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षकांना दुसऱ्या शहरातील कॉलेजांमध्ये पाठवून ‘एमसीआय’ची मान्यता मिळवण्यात शासकीय तसेच खासगी वैद्यकीय कॉलेजांचे संस्थाप्रमुख तरबेज झाले आहेत. रुग्णालयातील ‘बेड ऑक्युपन्सी’ दाखवण्यासाठी ट्रकभरून रुग्ण ‘आयात’ केले जातात. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच सर्व वैद्यकीय शिक्षकांच्या बायोमेट्रिक्सची नोंद ‘एमसीआय’शी थेट जोडली जाणार आहे. देशभरातील सर्व वैद्यकीय कॉलेजांमधील अधिष्ठातांसह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांची रोजची व वर्षभरातील नोंद तपासता येणार आहे. परिणामी, कोणता प्राध्यापक कुठे हजर-गैरहजर आहे, एकूण हजेरी, प्राध्यापक किती वाजता कॉलेजमध्ये आला व गेला आदी बाबी उघड होणार आहेत.

भर सह्यांवरच !

वैद्यकीय कॉलेजांमधील प्राध्यापक, कर्मचारी आदी सर्वांसाठी बायोमेट्रिक पद्धत कार्यान्वित झाली आहे. याची नोंद थेट कोषागार कार्यालयात होते. मात्र, अजूनही वेतन काढताना वैद्यकीय शिक्षकांच्या हजेरीची नोंद सह्यांवरूनच ग्राह्य धरली जाते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच एकदम सह्या करून हजेरी दाखवण्याचे ‘उद्योग’ मोठ्या प्रमाणावर होतात. या निर्णयामुळे अशा प्रकारांनाही आळा बसेलच; पण ‘क्लिनिकल’ विषयातील शिक्षकांची व एमर्जन्सी सेवा देणाऱ्या शिक्षकांची यात अडचण होऊ शकते, असाही शिक्षकांचा मतप्रवाह आहे.

‘एमसीआय’च्या नवीन निर्णयानुसार ‘डीन’पासून सर्व वैद्यकीय शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरीची नोंद ‘एमसीआय’ला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देशभरातील सर्व फॅकल्टींचा ‘डेटा’ उपलब्ध होईल. गैरप्रकारांनाही आळा बसू शकेल. शिक्षकांची अपेक्षित हजेरी नसेल, तर कॉलेजची मान्यता रद्द करण्याची किंवा विद्यार्थ्यांच्या जागा कमी करण्याचे अधिकारही ‘एमसीआय’ला आहेत.

– डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता (घाटी) व एमसीआय निरीक्षक

‘एमसीआय’च्या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांतील गैरप्रकार नक्कीच कमी होतील. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारेल.

– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (नांदेड)

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *