facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / अहमदनगर / जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले

जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यानंतर चलन तुटवड्यामुळे जिल्ह्यातील जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत. सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेल्या दस्तऐवजाची नोंदणीवरुन हे स्पष्ट होत असून पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये या व्यवहारांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. आता जानेवारीत येणाऱ्या नव्या रेडीरेकनरमध्ये मालमत्तांचे दर काय असतील याची उत्सुकता आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण बारा दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालये असून वर्ग-२ ची पाच कार्यालये आहेत. या सर्व १७ कार्यालयांमार्फत दस्तऐवजांची माहिती ही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येते. त्यानुसार नोटा बंदीचा निर्णय झाल्यानंतर आठ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये केवळ दोन हजार ६४६ दस्तऐवजांची नोंद झाली. विशेष म्हणजे एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या अवघ्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल एक हजार ३५९ दस्तऐवजांची नोंदणी करण्यात आली होती. दस्तऐवजांची नोंदणी करताना, तसेच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचा जास्त वापर होतो. परंतु नोटाबंदीमुळे जमीन व्यवहारांचे प्रमाण अत्यंत कमी झाले असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

४७ हजार ७९३ नोंदणी

जिल्ह्यातील सह निबंधक कार्यालयामध्ये जमीन, फ्लॅट, प्लॉट, अशा स्थावर मिळकतींच्या खरेदी-विक्रीची नोंदणी, गहाणखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र आदी विविध प्रकारच्या दस्त नोंदणीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एक एप्रिल २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०१६ या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल ४७ हजार ७९३ दस्त नोंदणी करण्यात आली. यामध्ये सप्टेंबर महिन्यांत सहा हजार २१५, ऑक्टोबर महिन्यांत सहा हजार ६८० दस्त नोंदणी करण्यात आली. तर, नोटाबंदीच्या निर्णय झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांत त्यामध्ये दोन हजारांची घट होऊन फक्त चार हजार पाच दस्त नोंदणी झाली आहे.

आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार नोटाबंदीच्या निर्णयानंतर खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये ३० टक्के घट जाणवत आहे. बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा असल्यामुळे तसेच जिल्ह्यामध्ये ऑनलाइन व्यवहार करण्याचे प्रमाण या क्षेत्रात कमी असल्याने हा फरक जाणवत असावा. सध्याची परिस्थिती पाहता जानेवारी महिन्यापर्यंत दस्तऐवजांच्या व्यवहारांमध्ये आणखी घट दिसून येण्याची शक्यता आहे.

-व्ही.एस.भालेराव, सहजिल्हा निबंधक

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *