facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नाशिक / पैशांचा मुहूर्त चुकला अन् तो जिवाला मुकला

पैशांचा मुहूर्त चुकला अन् तो जिवाला मुकला

नाशिक ः गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलेले मुलाच्या स्वेटरचे नऊशे रुपये मिळविण्यासाठी त्यांनी तब्बल दोन वर्षे प्रतीक्षा केली. नशिबाने दीर्घ प्रतीक्षेनंतर हे पैसे एकदाचे खात्यावर जमाही झाले; पण नियोजनशून्य असलेल्या आदिवासी विभागाचा पैसा जमा करण्याचा मुहूर्त चुकला अन् स्वेटर मिळवण्याच्या गर्तेत मात्र सातवीतल्या श्रावणाचे डोक्यावरचे छत्रच कायमचे हरवले. नोटबदलाच्या पार्श्वभूमीवर ढेपाळलेल्या यंत्रणेचे बळी ठरलेल्या दिनेश जाधव या आदिवासीची कथाच विदारक आहे. मुलाच्या स्वेटरचे स्वप्न बाळगणाऱ्या बापाने अखेरीला या नोटांच्या रांगेतच प्राण सोडल्याने लालफितीचा अनुभव घेतलेले जाधव कुटुंब आज अक्षरशः रस्त्यावर आले आहे.

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील मुलांना स्वेटर देण्याचा निर्णय दोन वर्षांपासून गाजत आहे. ठेकेदार व मंत्रालयातील बाबूंच्या लागेबांधीतून पाच वर्षांपासून आदिवासी मुलांना स्वेटरच मिळाले नाहीत, तर दोन वर्षांपासून ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भांडणात खरेदीच झाली नाही. माध्यमांच्या दबावानंतर आदिवासी विभागाने अखेरीस हिवाळ्याच्या तोंडावर ५५४ आश्रमशाळांमधील एक लाख ८७ हजार विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याऐवजी त्यांच्या खात्यात रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या नादात विभाग नोटाबंदीचा निर्णयच विसरले. एकीकडे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी बँकांमध्ये पैसा मिळत नसताना आदिवासींना कुठून मिळणार, याचा सारासार विचारही विभागाने केलेला नाही. आदिवासी विभागाच्या भ्रष्ट यंत्रणेने योजना पोहोचविण्यात दिरंगाई केल्याने त्याचेही बळी जात असल्याचे चित्र आहे.

जव्हार तालुक्यातील झोप आश्रमशाळेतील श्रावण जाधव हा सातवीच्या वर्गात शिकतो. त्याचे वडील दिनेश जाधव मोलमजुरी करतात. त्याच्या कुटुंबात दिनेशची आई, पत्नी, दोन मुले व मुलगी असे सदस्य आहेत. श्रावणला आदिवासी विभागाकडून दिले जाणारे स्वेटर पाचवीपासून मिळालेच नाही. मात्र, आदिवासी विभागाने रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यात घेतला. त्यानुसार त्याचे वडील दिनेश जाधव यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ९०० रुपये विभागाने जमा केले. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या बँकांमध्ये असलेल्या चलनटंचाईचा फटका त्याच्या पालकांना बसला. गेल्या आठवड्यात तीनदा तो बँकेत गेला. मात्र, नंबर लागत नसल्याने तो जव्हारहून परत घरी जात होता. थंडीत कुडकुडणाऱ्या मुलाकडे बघवले जात नसल्याने अखेरीस सोमवारी (५ डिसेंबर) त्यांनी जव्हारची महाराष्ट्र बँक सकाळी सात वाजताच गाठली. पहिला नंबरही लावला. मात्र, इथेही दुर्दैव आड आले. इंटरनेटअभावी बँकेचा व्यवहारच ठप्प पडला. नंबर जाऊ नये म्हणून रांगेतच उभे राहिले; मात्र मुलासाठीची ही तळमळ अखेरीस त्यांच्या जिवावर बेतली अन् चक्कर येऊन ते खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना जव्हार रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुरेसे उपचार मिळत नसल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अखेरीस त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली.

…तर अंगावर काटे!

स्वेटरच्या नादात श्रावणने त्याच्या वडिलांनाच गमावले तर संपूर्ण कुटुंबाचा तारणहारच आज नसल्याने जाधव कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. भ्रष्टाचारात त्याला दोन वर्षे स्वेटरच मिळाले नाही. शेवटी पैसे खात्यावर जमा झालेही, मात्र त्याच्यासाठी वडिलांचे छत्र गमावले आहे. आता त्याला पैसे मिळतीलही, मात्र ज्या स्वेटरमुळे वडील गेले, ते स्वेटर परिधान करताना त्याच्या अंगावर काटेच उभे राहतील. भ्रष्टाचार व नोटाबंदीचा एकत्रित ठरलेला श्रावण हा एकटाच बळी नसून, आजही असंख्य आदिवासींना स्वेटरसाठी बँकाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *