facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नागपूर / मराठा आरक्षण : धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

मराठा आरक्षण : धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारले काय’, असा टोमणा मारत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन केले.

मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारा ठराव विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. त्यावर बोलताना मुंडे यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही प्रखर टीका केली. रा. स्व. संघ आरक्षणविरोधी आहे. त्यामुळे मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची वृत्तीच भाजपकडे नाही. १४ डिसेंबरला नागपुरात मराठा येत आहेत. मराठा समाजाला दिलासा द्यायचा असेल, तर मोर्चापूर्वी आरक्षणाचा निर्णय घ्या, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शपथपत्र दाखल करण्यास राज्य सरकारने विलंब केला. मोर्चांची धग कळल्यावर २७०० पानी शपथपत्र दाखल केले, पण त्यावेळी विशेष सरकारी वकील हरीश साळवे उपस्थित राहिले नाहीत.

त्यामुळे मराठा समाजाच्या मनात सरकारबाबत संशय निमाण होत आहे. शिवसेनेने मराठा मोर्चाची टिंगल केली होती, ते आता कोणत्या तोंडाने आरक्षण मागत आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

बडोलेंची हकालपट्टी करा : राणे

मराठा आरक्षणास उघड विरोध करणारे राज्यमंत्री राजकुमार बडोले यांची हकालपट्टी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. मराठा समाज मागास आहे, हे राणे समितीने सिद्ध केले आहे. तरीही राणे समितीमुळेच हायकोर्टाने स्थगिती दिल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला. ‘मटा’मधील बातमीचा संदर्भ घेत राणे यांनी शेलार यांच्यावरही तोंडसुख घेतले. कोणतीही माहिती न घेता आरोप केल्याचा दावा राणे यांनी केला. नागपुरातील मराठा मोर्चाकरिता येणाऱ्यांची अडवणूक होत आहे, नागपुरात येण्यापासून रोखल्यास राज्यात एकही रेल्वे धावणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

राजकारण करू नका : मेटे

मराठा समाजावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून राजकारण होत असून ते थांबवण्यात यावे, असे आवाहन करताना विनायक मेटे यांनी दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे प्रस्ताव सादर का झाले, यावर आश्चर्य व्यक्त केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काहींचा विरोध असल्यानेच तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही, असा दावा मेटे यांनी केला.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *