facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / जिल्ह्यात रब्बीची ८९ टक्के पेरणी

जिल्ह्यात रब्बीची ८९ टक्के पेरणी

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – जिल्ह्यात रब्बी पिकांची ८८.८९ टक्के पेरणी झाली आहे, तर कांदा पीक लागवडदेखील उद्दिष्टापेक्षा यंदा जास्त होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी कमी पावसाचा आणि दुष्काळाचा फटका रब्बी पेरणीला बसला होता. केवळ बागायती क्षेत्रात रब्बीची लागवड झालेली होती. या पार्श्वभूमीवर यंदा समाधानकारक पाऊस झालेला आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणीसाठा झालेला आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून भूगर्भातील पाणीपातळी ही दोन मीटरपर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रदेखील वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी पिकाचे १ लाख ५२ हजार ६७५ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १ लाख ३५ हजार ८९३ हेक्टरमध्ये रब्बी पिकांची पेरणी झालेली आहे. यात रब्बी ज्वारी २३६२६ हेक्टर, गहू २५३७८ हेक्टर, रब्बी मका ३९१०४ हेक्टर, हरभरा ४५६२९ हेक्टर, कडधान्य ४५६७१ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. तेलबियांबाबत क्षेत्र वाढावे असे प्रयत्न होत असताना अद्याप जिल्ह्यात तेलबियांची पेरणी मात्र, झालेली दिसत नाही. पुरेसा पाऊस आणि सध्या असलेली थंडी यामुळे गहू, मका व हरभरा यांना पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात कांदा क्षेत्र वाढणार

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकरी कांदा पिकाकडे वळत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ७३७९ हेक्टर रब्बी कांदाचे क्षेत्र असताना आतापर्यंत १०३१४ हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झालेली असून, अजूनही लागवड होत आहे. त्यामुळे यंदादेखील अपेक्षेपेक्षा जास्त लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी १९५०० हेक्टरमध्ये कांदा घेतला गेला होता. नाशिक विभागात खरीपात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होत असते. यंदा मात्र, नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात खरीपाची लागवड झालेली नाही.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *