facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / पुण्यातील कार्यक्रम मनाला शांती देणारा

पुण्यातील कार्यक्रम मनाला शांती देणारा

‘पुणे हे संगीताचे तीर्थक्षेत्र आहे. मंदिरात जाऊन मनाला जी शांती मिळते ती, पुण्यात कला सादर केल्यानंतर मिळते,’ अशी भावना तरुण बासरीवादक देबोप्रिया आणि सुचिस्मिता या भगिनींनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘सवाईच्या व्यासपीठावर अक्षरश: घाम फुटला होता. आम्ही बासरीवादन करू शकू का, असा प्रश्न क्षणभर मनात आला. मात्र या व्यासपीठाच्या आणि रसिक श्रोत्यांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे आम्ही आत्मविश्वाने सादरीकरण करू शकलो,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील ‘अंतरंग’ उपक्रमात त्या बोलत होत्या. मंगेश वाघमारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
‘लहानपणापासूनच वडिलांनी प्रोत्साहन दिले. पं. भोलानाथ यांच्याकडे शिक्षण सुरू झाले. त्यानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मार्गदर्शन मिळाले. गुरूंच्या गुरूंची तालीम मिळण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मुली बासरी शिकत आहेत असा भेदभाव ना गुरूंनी केला ना रसिकांनी… त्यामुळे आजपर्यंतचा बासरीवादनाचा प्रवास पार पडला,’ या शब्दांत देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांनी आपला कला प्रवास उलगडला. सवाई महोत्सवात सादरीकरण करायला मिळणे हा जीवनगौरव आहे. या क्षेत्रातील सर्वांनी आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे, असे आम्ही मानतो, असेही त्या म्हणाल्या. दिवंगत गायिका वीणा सहस्रबुद्धे आणि हार्मोनियमवादक गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील माहितीपट दाखविण्यात आले.

देबोप्रिया अन् मास्टर स्ट्रोक

‘एकत्र बासरीवादन करायचे आम्ही ठरवले नव्हते. आम्ही कोणतीही गोष्ट मिळूनच करतो. आमच्यामध्ये फक्त एका वर्षाचे अंतर असल्यामुळे ते असेल. आमचे शिक्षणही एकत्रच पूर्ण झाले. त्यामुळे बासरीवादनही एकत्रच करतो,’ असे उत्तर देबोप्रियाने दिले. त्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्यांच्या वडिलांनी दोघींचे लग्नही एकत्रच झाल्याचे सांगितले. त्यावर देबोप्रियाने ‘लग्न एकत्रच; पण दोन वेगळ्या पुरुषांशी,’ अशी मार्मिक टिप्पणी करून आपल्यातील हजरजबाबी कलाकाराची चुणूक दाखवली. देबोप्रियाच्या या ‘मास्टर स्ट्रोक’मुळे रसिकांमध्ये खसखस पिकली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *