facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / वाड्या-वस्त्यांवर पोहोचणार वीज

वाड्या-वस्त्यांवर पोहोचणार वीज

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – देशातील ४० कोटी जनता अजूनही अंधारात चाचपडत असून, आठ कोटी घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही. या घरांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याची घोषणा केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी केली होती. दुर्दैवाने त्या आठ कोटी घरांपैकी काही घरे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. आनंदाची बाब म्हणजे या घरांपर्यंत वीज पोहचविण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. जिल्हा नियोजन मंडळातील १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी २६ वाड्या वस्त्यांवर वीज पोहोचविण्यासाठी देण्यात आला असून त्याचे काम सुरू झाल्याने लवकरच या ठिकाणी वीज पोहोचणार आहे.

महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर ६९ वर्षांनंतरही अद्याप अनेक वाड्या वस्त्यांवर वीज पोहोचली नाही. देशात ओडिशा, बिहार, छत्तीसगड, आसामसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये अनेक गावांत वीज पोहोचलेली नाही. महाराष्ट्रात तुलनेत बरी स्थिती असली, तरी कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यातही २६ वाड्या वस्त्यांमध्ये वीज पोहोचली नसल्याचे स्पष्ट झाले होते. कोल्हापूर जिल्हा १०० टक्के इलेक्ट्रिफाइड मानला जात होता. पण, २०११च्या जनगणनेमध्ये दुर्गम भागातील २६ गावांना वाड्या-वस्त्यांचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे त्या वस्त्यांपर्यंत वीज पोहचविण्याची प्रक्रिया सुरू झाली.

केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर मोदी सरकारने दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना जाहीर केली होती. या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील २६ वस्त्यांपर्यंत वीज पोहचविण्याचे काम करण्यात येणार होते. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेपेक्षा जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून वीज पोहचविण्याची सूचना केली. जिल्ह्यातील २६ वस्त्यांपैकी सात वस्त्यांवर सध्या वीज पोहोचली आहे. उर्वरित १९ वस्त्यांपर्यंत वीजजोडणीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. बी. मारुलकर यांनी सांगितले.

दीनदयाळ योजनेतून या वस्त्यांवर वीज पोहोविण्यासाठी एक कोटी ८० लाख रुपये तरतूद करण्यात आली होती. तेवढीच तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कामासाठी करण्यात आली आहे. सध्या विजेच्या कामांसाठी समितीतून २०१६-१७ साठी चार कोटी रुपये मंजूर आहेत. त्यातीलच एक कोटी ८० लाख रुपये वाड्या वस्त्यांवर वीज पोहोचविण्यासाठी वापरले जाणार आहेत. या एक कोटी ८० लाखमधून तेथील स्ट्रीट लाइटची कामे होणार नाहीत. त्यामुळे ती पुढील वर्षीच्या बजेट मधून करण्यात येतील, अशी माहिती मारुलकर यांनी दिली.

वनविभागीची एनओसी

वाड्या वस्त्यांवर वीज पोहचविण्याच्या प्रक्रियेत वीज महावितरण कंपनीला राज्याच्या वनविभागाकडून एनओसी (ना हरकरत प्रमाणपत्र) मिळणे गरजेचे असते. वीज नसलेल्या वाड्या वस्त्या दुर्गम डोंगराळ रागांमध्ये असतात. वीजेचे खांब उभारणे, विद्युत तारा यांमुळे वनांमधील वृक्षसंपदा आणि प्राण्यांना धोको पोहचू शकतो. त्या पार्श्वभूमीवर संबंधित वस्तीवर कोणत्या मार्गाने वीज पोहोचवावी, याची एनओसी वन विभाग देत असते. सध्याच्या १९ वस्त्यांसाठी महावितरणकडून वन विभागाकडे एनओसीसाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत.

येथे पोहोचली वीज

अंबाई धनगरवाडा, नाइकोबाचा माळ (शाहूवाडी), लमाणवाडा, धनगरवाडा (इब्राहिमपूर), धनगरवाडा (कनूर खुर्द), भंडारी वस्ती, नागरगाव (सर्व चंदगड तालुका).

येथे पोहोचणार वीज

धनगरवाडा (नांदरी, शाहूवाडी), फये, कोळवण, वसनोली, बेडीव, हिदवाडे, गिरवाग येथील धनगरवाडे, हंड्याचावाडा, पाटीलवाडी (दोन्ही फये), मेघोली एरंडपे येथील धनगरवाडे (सर्व भुदरगड), अणी, हंसनगाव, फराळे, हंसने येथील धनगरवाडे, बुजवडे पाटीलवाडी, कुर्डवाडी येताळवाडी, सोळांकूर रामनगर, आमजाही व्हरवडे लिंधडेवस्ती (सर्व राधानगरी).

वाड्या वस्त्यांवर वीज पोहचविण्यासाठीच्या कामाचे टेंडरींगही झाले आहे. विभागाकडे एनओसीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. टेंगर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, काम लवकरात लवकर सुरू होईल, यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.

– एस. बी. मारुलकर, कार्यकारी अभियंता, महावितरण

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *