facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘कॅशलेस’साठी प्रशिक्षण

‘कॅशलेस’साठी प्रशिक्षण

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन टंचाईचा सामना करण्यासाठी बँकांनी आता ग्राहकांनी जास्तीतजास्त कॅशलेस व्यवहार करावेत, याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विविध बँका व संस्थांकडून कॅशलेस व्यवहाराबाबत माहिती देणारे प्रशिक्षण सुद्धा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच शहरातील विविध बँकांच्या बाहेर कॅशलेस व्यवहारांबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्यानंतर बँका व पोस्ट ऑफिसच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. याकाळात हजारो कोटी रुपये किंमतीच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जिल्ह्यातील विविध बँकांमधून बदलून देण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून बँकांमध्ये भरणा करण्यासाठी येणाऱ्या खातेदारांकडून शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटा बँकांमध्ये येत नाहीत. त्यातच बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्याकडूनही मुबलक प्रमाणात चलन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सध्या बँका चलन टंचाईचा सामना करीत असून ग्राहकांनी जास्तीतजास्त कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात येतेय. कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यासाठी विविध बँका कार्याशाळा सुद्धा आयोजित करीत आहेत.
कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी भारतीय स्टेट बँकेमार्फत बी-बियाणे, खते व औषधे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना छोटे एटीएम मशीन देण्याचा उपक्रम हाती घेतलाय. यामुळे व्यवहारामध्ये अधिक सुलभता येणार असल्याचे स्टेट बँकेच्या सावेडी शाखेतील अधिकारी उमा साळे यांनी सांगितले. कुठल्याही बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे आपल्या गरजेनुसार शेतकऱ्यांना खरेदी करता येणार असल्याचेही साळे यांनी सांगितले. तर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे हे म्हणाले की, ‘जिल्ह्यात मोठ्या संख्येने औषध विक्रेते असून, त्यांना छोटे एटीएम मशीन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांना फायदा होईल. यासाठी लवकरच जिल्ह्यातील सर्प विक्रेत्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल.’ याप्रसंगी कृषी अधिकारी विलास नलगे, नोडल ऑफिसर स्नेहल कुलकर्णी व खते व औषध विक्रेते उपस्थित होते.
कॅशलेस व्यवहार अधिक व्यापक होण्यासाठी अॅक्सिस बँकेने देखील पुढाकार घेतला असून व्यापारी व शेतकऱ्यांसाठी मोबाइल अॅप सुरु केली आहे. या अॅपचे नुकतेच नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अप्पा कर्डिले, रेणव चोभे, दिलीप भालसिंग, अभय भिसे, बँकेचे नागपूर सर्कलप्रमुख सृष्टी नंदा, नगर शाखा व्यवस्थापक महेंद्रसिंग जगताप, चेतन जोशी, मनोज कडलग उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *