facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘गर्भलिंगनिदान’च्या अटी शिथिल

‘गर्भलिंगनिदान’च्या अटी शिथिल

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – गर्भलिंगनिदान प्रतिबंधक चाचणी (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार फॉर्म ‘एफ’संदर्भात डॉक्‍टरांचा आक्षेप आहे. कारकुनी कारणावरून डॉक्टरांना यामुळे थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. ही समस्या लक्षात घेता या कायद्यातील जाचक अटी काही अंशी शिथिल करण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच यात सुधारणा लागू होईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली.

नागपुरातील खासगी रुग्णालयांनी एकत्र येऊन विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन (व्हीएचए) संघटना स्थापन केली आहे. तिच्या कार्यकारिणीचे पदग्रहण रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे झाले. त्यावेळी डॉ. सावंत बोलत होते. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, कॉलेज ऑफ फिजिशियन्स अॅण्ड सर्जनचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उदय माहुरकर, सचिव डॉ. अनुप मरार, डॉ. पिनाक दंदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कुपोषणमुक्तीसाठी खासगी डॉक्‍टरांनी सरकारच्या उपक्रमात सामील व्हावे, असे भावनिक आवाहन करत डॉ. सावंत म्हणाले, ‘डहाणू, पालघर, मेळघाटातल्या आदिवासी पाड्यांवर टेलिमेडिसिन हा पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राज्यभर राबविला जाईल. डॉक्‍टरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार गंभीर आहे. रुग्णालयाचे नूतनीकरण, फायर एनओसीसारख्या बाबींमुळे महापालिका स्तरावर प्रक्रिया आणखी सुलभ केली जाईल.’

महापौर म्हणाले, ‘वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूकडून हिंगणाकडे जाणाऱ्या मार्गावर ऑरेंजसिटी स्ट्रीटचा विकास केला जाणार आहे. या परिसरात तीन लाख स्क्वेअर फूट जागा रुग्णालयांसाठी आरक्षित राहील. खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी येथे गुंतवणूक केली तर हा रस्ता ऑरेंजसिटी हेल्थ स्ट्रीट म्हणून विकसित होईल.’

ज्या पॅथीत शिक्षण त्याच पॅथीत प्रॅक्टिस ही वैद्यकक्षेत्रातील नैतिकता आहे. क्रॉसपॅथीही जगभर अनैतिक मानली जाते. त्यामुळे आगामी महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या निवडणुकीत प्रगती पॅनल विजयी झाले तर क्रॉसपॅथी विरोधातली मोहीम आणखी तीव्र केली जाईल, असे डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले. रुग्णसेवेच्या क्षेत्रात सकारात्मक बदलांमध्ये ही संघटना पुढाकार घेते. याशिवाय डॉक्‍टरांच्या सुरक्षेसंदर्भात शासनाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना देण्यात आले.

यावेळी मेडिकलचे डॉ. जगदीश हेडावू, डॉ. समीर गोलावार, डॉ. रमेश पराते, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या नागपूर शाखेच्या डॉ. अनुराधा रिधोरकर, डॉ. शिल्पी सूद यांच्यासह ४८ वैद्यकीय संघटनांच्या प्रतिनिधींचा सत्कार आरोग्यमंत्री डॉ. सावंत आणि महापौर दटके यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. उदय माहोरकर, सूत्रसंचालन डॉ. वीणा देशपांडे, डॉ. समीर जहागीरदार यांनी केले. आभार डॉ. दंदे यांनी मानले.

अशी आहे टीम व्हीएचए

डॉ. उदय माहोरकर (अध्यक्ष), डॉ. अनुप मरार (सचिव), डॉ. समीर पाटलेवार (कोषाध्यक्ष), डॉ. अशोक अरबट, डॉ. प्रशांत रहाटे (उपाध्यक्ष), डॉ. दीपक देशमुख, श्रीमती सुजाता, डॉ. जितेन्द्र हजारे, रवि मन्नादियार, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. अविनाश पोफळी, डॉ. शांतनु सेनगुप्ता, डॉ. राजन बारोकर, डॉ. सदाशिव भोले, डॉ. राजेन्द्र अग्रवाल आणि डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. एन. पी. तोलानी, डॉ. आशुतोष आपटे, डॉ. सुहास सालपेकर, डॉ. निरंजन धारस्कर, डॉ. बी. के. मुरली, डॉ. प्रकाश केतन, डॉ. अनिल श्रीखंडे, डॉ. श्रीकांत मुकेवर, डॉ. मुकुंद ठाकुर आणि डॉ. आनंद डोंगरे (सदस्य).

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *