facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / निसर्गाशी नाते जुळायला हवे

निसर्गाशी नाते जुळायला हवे

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘पूर्वजांपासून चालत आलेले बिबट्यांबरोबर सहचर्य आजही शक्य आहे. आदिवासी लोकांप्रमाणे शहरी नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. बिबट्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मनुष्य आणि प्राणी संघर्ष संपविण्यासाठी निसर्गाशी तुटलेले नाते पुन्हा जुळले पाहिजे,’ असे मत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी व्यक्त केले.
पुणे वन्यजीव विभागातर्फे बीबीसी छायाचित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे वन्यजीव विभागातर्फे खानोलकर यांचा प्रसिद्ध सर्प अभ्यासक नीलमकुमार खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, मानद वन्यजीव रक्षक अनुज खरे, किरण पुरंदरे यांसह वनाधिकारी उपस्थित होते. खानोलकर यांनी ‘बिबट्यांबरोबरच सहजीवन आणि छायाचित्रातून वन्यजीव संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
खानोलकर म्हणाले, ‘जीम कॉर्बेट अभयारण्याजवळील वस्तीत लोकांनी बिबट्याला जाळताना मी पाहिले आणि माझ्या फोटोग्राफीला वेगळे वळण मिळाले. वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांच्या मार्गदर्शन घेऊन बोरिवली नॅशनल पार्क परिसरात संशोधनाला सुरुवात केली. बिबटे जंगलात राहतात, हा गैरसमज आहे आणि ते वन विभागाची मालमत्ता आहेत, अशी लोकांची आज मानसिकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या ताणामुळे नागरिकांची सहनशक्ती कमी होत आहे. त्यामुळे ते वन्यजीवांवर राग काढत आहेत. मुंबईत वन क्षेत्राचा बफर आणि रहिवासी क्षेत्र अशी सीमा रेषा कधीच पुसली गेली आहे. संशोधनादरम्यान कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये मला वाड्या, सोसायट्यांजवळ राहणाऱ्या बिबट्यांचे अनेक अनोखे जग समोर आले.’
‘खरे तर बिबट्यांनी आता शहरात राहण्याची कला आत्मसात केली आहे. त्यांना वाहतुकीची भीती वाटत नाही. माणसाच्या नकळत वस्त्यांजवळ कसे राहायचे, रहदारीतून वाट कशी काढायची याचे प्रशिक्षण बिबट्या माद्या त्यांच्या पिल्लांना देत आहेत. कचऱ्यामुळे वाढलेली कुत्री आणि डुकरांमुळे बिबट्यांना मुबलक अन्न उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास न देता बिबट्यांची अनेक कुटुंब शहरात राहत आहेत, असे सांगून खानोलकर यांनी सांगितले. या विधानाला पुष्टी देण्यासाठी त्यांनी रात्री शांत झालेल्या वस्त्यांमध्ये वावणाऱ्या बिबट्यांची दुर्मिळ छायाचित्रे दाखविली. मनुष्य आणि बिबट्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे, असे आवाहन खानोलकर यांनी केले.
..,…..
इतरांच्या तुलनेत भारतीय वन्यप्राण्यांबाबत अधिक सहिष्णू आहेत. मात्र, शहरी नागरिकांची सहनशक्ती कमी होत चालली आहे. त्यांना घराजवळ जंगल हवे आहे, पण तेथील प्राण्यांचा उपद्रव नको आहे. तर दुसरीकडे बिबट्यांनी शहरात राहण्याची कला आत्मसात केली आहे. माणसाच्या नकळत बिबट्यांची कुटुंब वस्ती, इमारतींच्या जवळ वास्तव्यास आहेत. भटकी कुत्री, डुकरांमुळे बिबट्यांना अन्नाचा तुटवडा भासत नाही.
– नयन खानोलकर, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *