facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / महिलांसाठी आता स्वतंत्र वाचनालये

महिलांसाठी आता स्वतंत्र वाचनालये

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – जगभरात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती व्हावी, महिलांना आपल्या आवडीची पुस्तके, साप्ताहिके; तसेच मासिके वाचता यावीत, यासाठी खास महिलांसाठी स्वतंत्र वाचनालये सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महिलांना घरगुती वस्तुंची खरेदी करता यावी, यासाठी या वाचनालयाच्या आवारात शॉपिंग मॉल उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात कर्वेनगर आणि वानवडी भागात हा प्रयोग केला जाणार आहे.

शहरातील विविध भागांत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाचनालये उभारण्यात आलेली असली, तरी या वाचनालयाचा उपयोग महिला वर्गाकडून फारसा केला जात नाही. महिलांना त्यांच्या आवडीची पुस्तके, मासिके सहजपणे वाचता यावीत, यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची सूचना पुढे आली होती. उपनगरांमध्ये वाचनालयाची सोय नसल्याने महिला वर्गाची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर कर्वेनगर, वारजे माळवाडी; तसेच वानवडी भागात ही वाचनालये सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर वाचनालय उभारण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या जागेत ही वाचनालये सुरू केली जाणार असून मराठीसह हिंदी, इंग्रजी या भाषेतील साहित्य येथे वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. या वाचनालयात सर्वसाधारण दीडशे ते दोनशे महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा बसविली जाणार आहे. महिलांसाठी सक्षमीकरण योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. वाचनालयात येणाऱ्या महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही; तसेच सुरक्षा पथक नेमले जाणार असल्याचे महापौर जगताप
यांनी सांगितले.

लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष

महिलांसाठी स्वतंत्र वाचनालयाचा प्रकल्प कर्वेनगर, वारजे भागात राबविला जाणार असल्याचे स्थानिक नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी सांगितले. या वाचनालयांमध्ये लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष उभारण्याचा विचार असून सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत हे सुरू राहील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी येथे घेतली जाणार असल्याचे दुधाणे यांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *