facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नागपूर / डॉ. काळेंचा विक्रम

डॉ. काळेंचा विक्रम

‘ग्रेसविषयी’ सांगताना उर्दू काव्यविश्वातला ‘गालिब’अर्थ उलगडणारे नि मर्ढेकर विशद करतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तिविशेष सांगणारे… कविमनाचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे डोंबिवली येथे होऊ घातलेल्या ९०व्या अख‌िल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विक्रमी मतांनी निवडून आले. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत डॉ. काळे यांनी ७९२ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी ९१ असून ही आजपर्यंतची सर्वाधिक मते आहेत. प्रसिद्ध कवी-गीतकार प्रवीण दवणे हे दुसऱ्या स्थानी राहिले. त्यांना १४२ मते मिळालीत.

डॉ. अक्षयकुमार काळे यांचे पारडे आधीपासूनच जड होते. मात्र प्रवीण दवणे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानंतर काळे यांना चांगली टक्कर मिळणार असे वाटत होते. रविवारी झालेल्या मतमोजणीत हा सामना मात्र एकतर्फीच झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ. काळे यांनी एकूण ८६४ वैध मतांपैकी ७९२ मते मिळविली. नागपूरचे डॉ. मदन कुलकर्णी तसेच डॉ. जयप्रकाश घुमटकर हे अन्य दोन उमेदवार फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. डॉ. कुलकर्णी यांना २७ मतांवर समाधान मानावे लागले. डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना केवळ तीन मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, निवडणूक प्रचारकाळात त्यांच्यावर शाईफेक झाली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी पत्रपरिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी डॉ. अक्षयकुमार काळे यांचे नवे संमेलनाध्यक्ष म्हणून नाव जाहीर केले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

–प्रवीण दवणेंचेच मत बाद

९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. अक्षयकुमार काळे विरुद्ध प्रवीण दवणे असा थेट सामना झाला नाहीच. भरीस भर दवणे यांचे स्वत:चे मतदेखील बाद ठरले. या निवडणुकीत ५० मते अवैध ठरली. यापैकी एक दवणे यांचे आहे. मतपत्रिकेच्या पाकिटावर स्वाक्षरी करणे गरजेचे असते. दवणे यांनी स्वाक्षरी केली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविलेल्या एकूण मतपत्रिकांपैकी १७ मतदारांनी मतपत्रिकांवर खाणाखुणा केल्याचे आढळले. एका मतदाराने मतपत्रिका कोरीच पाठवली. १४ मतदारांनी नियमानुसार मराठीत मतपत्रिका न भरता इंग्रजी भाषेत पाठवल्यामुळे त्याही रद्द करण्यात आल्या. १५ मतदारांनी लिफाफ्यावर स्वाक्षरीच केलेली नव्हती. यात दवणे यांचाही समावेश आहे. निवडणुकीत मतदाराला मतदान करण्याचा अधिकार असतो. हा मतदानाचा अधिकार दवणे यांना स्वतःसाठी बजावता आला नाही.

–महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्रच नव्हे तर सर्वच ठिकाणांहून मला मतदारांनी भरभरून मते दिलीत; नव्हे अख्ख्या भारतातूनच मला एकगठ्ठा मते मिळाली आहेत.
– डॉ. अक्षयकुमार काळे

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *