facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / पुणे / दुचाकीचोरीत चौपट वाढ

दुचाकीचोरीत चौपट वाढ

दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता वाहनचोरांचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा वाहनचोरीच्या घटनांमध्ये चौपट वाढ झाली आहे. वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यात आणि उघडकीला आणण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे रोखण्यात अपयश येत असल्याने स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेकडून एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे राज्यात सर्वाधिक दुचाकींमध्ये पुणे अग्रस्थानी आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. शहरात दर वर्षी साधारणतः सहाशे वाहने चोरीला जातात. त्यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१५ मध्ये शहरातून ५७४ वाहने चोरीला गेली होती. मात्र, यंदा वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून, ८ डिसेंबरपर्यंत २,५५० वाहनांची चोरी झाली आहे. शहरातील वाहनचोरीचा वाढता ‘आलेख’ पाहता पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाढणाऱ्या वाहनचोरीवर काय उपाययोजना केल्या आहेत, याची त्यांनी विचारणा केली. त्यावेळी गुन्हे शाखेकडून स्थानिक पोलिसांकडे बोट दाखविण्यात आले. गुन्हे शाखेकडून वाहनचोरीमध्ये अनेक छोट्यामोठ्या घटनांचा तपास करण्यात आला. तसेच, पोलिस ठाण्यांनीही काही वाहनचोरांना पकडले. मात्र, प्रत्येक वेळेस पोलिस आयुक्तांनी जाब विचारल्यानंतरच कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहनांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. अन्य प्रकारची गुन्हेगारी नियंत्रणात येत असताना वाहनचोरीचे प्रमाण वाढत आहे. यंदा घडलेल्या वाहनचोरीच्या अडीच हजार गुन्ह्यांपैकी फक्त २७ टक्के (६७५) गुन्हेच उघडकीस आले आहेत. बहुतांश वेळा वाहनचोरी करणारे आरोपी सराईत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे.

वाहनचोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथक
शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता तपास करण्यासाठी गुन्हे शाखेमध्ये वाहन चोरीविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. गुन्हे शाखेमध्ये यापूर्वीही वाहनचोरीविरोधी आणि साखळीचोरी विरोधी पथके होती. मात्र, त्यांना गुन्हे रोखण्यात अपयश आले. ही पथके फक्त नावालाच राहिल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दोन्ही पथके बंद केली होती. आता पुन्हा नव्याने वाहन चोरीविरोधी पथक सुरू केले आहे. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

वर्ष वाहनचोरीचे गुन्हे
२०१३ १०४१
२०१४ ६५७
२०१५ ५७४
२०१६ २५५० (८ डिसेंबरपर्यंत)

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *