facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / रायगडावरील तलवारीचे काम पूर्ण

रायगडावरील तलवारीचे काम पूर्ण

रायगडावरील मेघडंबरीमध्ये बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामधील अर्धी तलवार गायब झाल्यानंतर रविवारी तातडीने हुबेहूब तलवार करण्यात आली. कोल्हापुरातील शिल्पकार सतिश घारगे यांच्या घरी पोलिस बंदोबस्तात हे काम पुर्ण करण्यात आले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्यकर्ते तलवार घेऊन सायंकाळी रायगडला रवाना झाले. सोमवारी (ता. १२ डिसेंबर) सूर्योदयावेळी ही नवी तलवार बसवण्यात येणार आहे.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य‌ाभिषेक सोहळा झाला. त्याच ठिकाणी २००९ साली शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बसवला. तो पुतळा येथील शिल्पकार सतिश घारगे यांनीच केला आहे. तो पंचधातूचा असून त्याचे वजन ८५० किलो आहे. त्यामध्ये तलवारीची लांबी ५० इंच लांब आणि वजन ३५ किलो इतके होते. या तलवारीचा सुमारे सात इंचाचा भाग गायब झाला आहे. पुतळ्याचे काम घारगे यांनी केल्याने नवीन तलवारी बसविण्यासाठी तातडीने त्यांनाच सांगण्यास सां​गितले.

खासदार संभाजीराजे छत्रपती रविवारी तातडीने रायगडावर पोहचले. पाचगावमधील शांतीनगर येथील घारगे या शिल्पकाराच्या घरी शनिवारी रात्री तीनपासून तलवार तयार करण्याचे काम सुरू झाले. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता तलवारीचे काम पुर्ण झाले. त्यानंतर ती नवीन तलवार घेऊन पोलिसांसोबत स्वत‍ः घारगे, फत्तेसिंह सावंत व अन्य कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. तलवारीचे काम सुरू असताना शिल्पकार घारगे यांच्या घरात रायगड येथील दहा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. कुणालाही शिल्पकाराला भेटू दिले नाही. हे काम ‌इतक्या पोलिस बंदोबस्तात ‌आणि गोपनियरित्या का केले जात आहे याचीच चर्चा त्या परिसरात होती.

दरम्यान, पूर्वी पुतळा बनविण्याच्या कामात असलेले इतिहास संशोधक, इंद्रजित सावंत हे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घारगे यांच्या घरी गेले. मात्र तलवारचे काम पाहण्यासाठी घारगे यांच्या घरात जाण्यास त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांची वादावादी झाली. याबाबत सावंत यांनी, ‘इतकी गोपनियता कशासाठी? इतका बंदोबस्त रायगडावर ठेवला असता तर तलवार गायबच झाली नसती’, अशा शब्दात पोलिसांना सुनावले. दरम्यान, सकाळी भाजप व युवा मोर्चाच्यावतीने शिवाजी चौकामधील ​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला.

पंचधातूपासून पुतळा बनवण्यात आला आहे. तलवारीचा भाग पुतळ्यापासून थोडा बाहेर होता. पुतळ्याला हार घालण्यासाठी अनेकजण जात असतात. त्यांच्याकडून वारंवार पडणाऱ्या दाबामुळे कदाचित हा प्रकार झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकाराचे गांभीर्य जाणून मी स्वत‍ः रायगडावर पोहचलो. दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून पुतळ्याच्या परिसरात लाइट, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच पुर्णवेळ सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे. नवीन तलवार घेऊन कार्यकर्ते कोल्हापुरातून निघाले आहेत. सोमवारी सकाळी नवीन तलवार बसवण्यात येणार आहे.

संभाजीराजे छत्रपती, खासदार

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *