facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / अहमदनगर / सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू

सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू

‘सरकार बदलले म्हणजे कायदे बदलत नाहीत व ‘आम्ही म्हणू तेच’, असेही चालत नाही. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ वा ‘इज ऑफ द बिझनेस’च्या नावाखाली कामगार कायदे बदलण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने केल्यास देशातील कष्टकरी कामगार या सत्ताधाऱ्यांना उचलून खाली पटकतील’, असा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनचे नवे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी रविवारी येथे दिला. वीज कामगारांच्या प्रश्नांबाबत नागपूर अधिवेशनादरम्यानच मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांची भेट घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनच्या स्थापनेस ५० वर्षे झाली आहेत. या फेडरेशनचे राज्य अधिवेशन दर तीन वर्षांनी होते. यंदाचे १७ वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन रविवारी सारसनगरमध्ये फेडरेशननेच बांधलेल्या सर्वमंगल सांस्कृतिक भवनात झाले. यावेळी फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार भाई जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे कष्टकरी, शेतकरी व असंघटित वर्गाच्या विरोधात असल्याचा आरोप केला. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, भाऊसाहेब कांबळे तसेच माजी खासदार दादा पाटील शेळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, फेडरेशनचे कार्याध्यक्ष प्रकाश गायकवाड, हंगामी अध्यक्ष गोविंद थोपटे आदी उपस्थित होते. फेडरेशनचे ज्येष्ठ सदस्य शेषराव डांगे यांना जीवनगौरव पुरस्कार यावेळी देण्यात आला.
‘परदेशातून काळे धन आणण्याच्या घोषणेसह शेतकऱ्यांच्या शेतमालावर ५० टक्के नफा गृहित धरून शेतमालाला भाव देण्याची घोषणा करणारे राज्य व केंद्रातील सत्ताधारी शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या भावनांशी खेळत असल्या’चा आरोप करून जगताप म्हणाले, ‘एसटी कामगार, ऊस कामगार व आता वीज कामगारांनी नेतृत्वाची संधी दिल्याने जातीपाती मानत नसलेल्या या सर्व कष्टकऱ्यांची संघटित ताकद उभी करून त्यांच्या रोजीरोटीचे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करणार आहे. कंत्राटी वीज कामगारांना कायम करण्यासह पेन्शन, रिक्त जागांची भरती व अन्य विषय नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री व उर्जा मंत्र्यांसमोर मांडू व ते सोडविण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यास त्यांना भाग पाडू’, असा दावाही त्यांनी केला.
मोहन प्रकाश यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्यांच्या कोणत्याही भाषणात कामगार, शेतकरी वा असंघटित वर्गाचे प्रश्न व वेदनांबाबत भाष्य नसते, असा दावाही त्यांनी केला. विखे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना, स्वतःचेच पैसे रांगेत उभे राहून काढण्याची सामान्य जनतेवर वेळ आणलेल्या या सरकारला आता जनतेपुढे रांगत यावे लागेल, असा दावाही केला. वीज कामगारांच्या प्रश्नांसाठी सरकारकडे पाठपुराव्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार थोरात व कांबळे तसेच दादा पाटील शेळके, सुनील शिंदे, विनायक देशमुख यांची भाषणे झाली. प्रकाश गायकवाड यांनी स्वागत केले. दामोदर चंगोले यांनी आभार मानले.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *