facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / आघाडीसाठी जोर; युती काडीमोडच्या उंबरठ्यावर

आघाडीसाठी जोर; युती काडीमोडच्या उंबरठ्यावर

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नगरपरिषद निवडणुकीनंतर आता तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांच्या निवडणुकीने जोर धरला आहे. तालुक्यातील सात जि. प. गट व पंचायत समितीचे चौदा गण ताब्यात घेण्यासाठी पक्षीय पातळीवर आतापासूनच रणनीती निश्चित होऊ लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची निर्मितीची शक्यता बळावली असताना युतीचे पुन्हा एकदा काडीमोड होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यात क्रमांक दोनच्या जिल्हा परिषदेच्या सात गटांचा समावेश बागलाण तालुक्यात होतो. गट व गणांच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी असल्याने जिल्हा परिषदेतील सत्तेची बहुतांश मदार या तालुक्यावर अवलंबून असते. नाशिक जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एकदा बहुमान या तालुक्याला मिळाला आहे. आगामी काळातील नवीन आरक्षण हे महिला सर्वसाधारण गटातील असल्याने नवीन गट-गण रचनेत दोन गट महिला सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने राजकीय लढाई रंगणार आहे.

बागलाण तालुक्यात पठावे दिगर, जायखेडा, ताहाराबाद, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा व ब्राह्मणगाव या सात जिल्हा परिषद गटांचा समावेश होतो. सद्यस्थितीत पठावे दिगर, जायखेडा, ठेंगोडा हे तीन गट राष्ट्रवादीकडे, ताहाराबाद व वीरगाव गट काँग्रेस, नामपूर भाजप व ब्राह्मणगाव गट शिवसेनेकडे आहे. यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जि. प. निवडणुकीत या सातही गट आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपच्या एकला चलो रे या भूमिकेतून पक्षीय कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी युतीची काडीमोड घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुक्यातील सातही गटांचे नव्याने आरक्षण बदलेले आहे. पठावे दिगर हा गट यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. यामुळे या गटातून महिला व पुरूष उमेदवारी करू इच्छित असल्याने राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्या सिंधुताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत, कळवणचे सदस्य रवींद्र पगार यांची नावे चर्चेत आहेत.

ताहाराबाद गट अनुसूचित जमाती गटासाठी राखीव झाला आहे. काँग्रेसचे जि. प. सदस्य प्रशांत सोनवणे यांची या ठिकाणी पंचाईत झाली आहे. या ठिकाणी आदिवासी समाजाला प्राधान्य मिळणार आहे.

जायखेडा गट सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. विद्यमान राष्ट्रवादीचे सदस्य यतीन पगार यांना या ठिकाणी पक्षातूनच आव्हान मिळणार आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, विनोद ठाकरे, दिनेश सावळा, इच्छुक आहेत. भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष संजय भामरे, नवलसिंग खैरणार, भाऊसाहेब भामरे यांच्यात लढत रंगणार आहे. नामपूर गट हा अनुसूचित जमातीकरिता राखीव झाला आहे. यामुळे विद्यमान भाजप सदस्या सुनीता पाटील यांनादेखील उमेदवारी थांबवावी लागणार आहे.

वीरगाव गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. यामुळे काँग्रेसचे विद्यमान सदस्य प्रा. अनिल पाटील यांना उमेदवारी करण्यासाठी आपला गट बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी आदिवासी महिला आरक्षण झाल्याने आदिवासी समाजाला प्राधान्य मिळणार आहे.

ठेंगोडा सर्वसाधारण गट हा सर्वसाधारण स्त्री गटासाठी राखीव झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य शैलेश सूर्यवंशी यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी आपल्या पत्नी हेमलता सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला आहे. काँग्रेसच्या वतीने माजी जि. प. सभापती यशवंत पाटील यांनी आपल्या पत्नी माजी सभापती संगीता पाटील, विद्यमान जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी आपल्या पत्नीला, तर राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरणार व शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आपल्या पत्नी अर्चना सोनवणे यांच्यासाठी या गटात चाचपणी सुरू केली आहे.

ब्राह्मणगाव गट सर्वसाधारण महिला गटासाठी खुला झाला आहे. यामुळे शिवसेनेचे विद्यमान सदस्य प्रशांत बच्छाव यांनी आपली पत्नी वैशाली बच्छाव यांना पुढे केले आहे. मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांनी आपला हा पूर्वाश्रमीचा गट असल्याने माजी जि. प. सभापती लता बच्छाव यांनी उमेदवारी निश्चित केली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *