facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / मद्य तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी

मद्य तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – डिसेंबर महिन्यात मद्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याच काळात परराज्यातून मद्याची अवैध वाहतूक केली जाते, त्याचबरोबर बनावट मद्य विक्रीचेही प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवरील तपासणी नाके सज्ज केले आहेत, तर नाक्यांसह महामार्गावरही हत्यारी बंदोबस्त तैनात केला आहे. मद्य तस्करी आणि भेसळ करणाऱ्यांवर विशेष पथकांची नजर राहणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी रंगीत-संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मद्याच्या विक्रीत मोठी वाढ होते. हीच संधी साधून भेसळखोर बनावट मद्याची विक्री करतात, तर गोवा राज्यात कमी किमतीत मिळणारे मद्य छुप्या पद्धतीने कोल्हापुरात आणून विकले जाते. यातून उत्पादन शुल्क विभागाचा लाखोंचा तोटा होतो, त्याचबरोबर भेसळीने आरोग्याचेही गंभीर प्रश्न उद्भवण्याची भीती असते. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः गोव्यातून होणारी मद्य तस्करी रोखण्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भर आहे. यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक संतोष झगडे यांनी आंबा, आंबोली-आजरा, गगनबावडा आणि दाजीपूर या ठिकाणी स्वतंत्र तपासणी नाके उभारले आहेत. या नाक्यांवर निरीक्षकांसह जवानांची नेमणूक केली आहे. या पथकाला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि बंदुकीसह २४ तास वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

गोवा बनावटीच्या मद्यासह कर्नाटकातून होणाऱ्या बनावट मद्याची तस्करी रोखण्याचेही आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल आणि शिरोळ तालुक्यातील निरीक्षकांना विशेष सूचना दिल्या आहेत. दररोज रात्रीच्या ठराविक वेळांमध्ये सीमाभागातील नाक्यांवर वाहनांची तपासणी करणे, संशयास्पद वाहतुकीवर लक्ष ठेवणे आणि मद्याच्या नियमित विक्रीवरही नजर ठेवली जात आहे. या कारवाईचा अहवाल दररोज अधीक्षक कार्यालयाला पाठवणे बंधनकारक केले आहे, यामुळे सीमाभागातून होणारी मद्य तस्करी आणि बनावट मद्याच्या विक्रीलाही आळा बसेल, अशी माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

भेसळीवर विशेष नजर

मद्यविक्री वाढताच भेसळीचे प्रमाणही वाढते. भेसळीसाठी साखर कारखान्यांमध्ये तयार होणारे कच्चे द्रव्य वापरण्याची शक्यता असते, त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांची आवक-जावक तपासण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक केली आहे. याशिवाय मद्यनिर्मिती करणाऱ्या चार कंपन्यांसाठीही स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

महामार्गावर स्वतंत्र पथके

डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पुणे-बेंगळुरू महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, पेट्रोल पंप या ठिकाणी छुप्या पद्धतीने मद्याची विक्री होते, असा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अनुभव आहे. यंदा चोरटी विक्री रोखण्यासाठी महामार्गावरही स्वतंत्रे पथके नेमली आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच या पथकांचे काम सुरू झाले आहे. यातून मद्याची चोरटी वाहतूक आणि विक्रीला आळा बसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

मद्यतस्करीमुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो, त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. वर्षाअखेरीस या प्रकारांमध्ये वाढ होते, त्यामुळे मद्य तस्करी आणि बनावट मद्य रोखण्यासाठी आम्ही महिनाभर आधीच काम सुरू केले आहे. गोव्यातून होणाऱ्या चोरट्या वाहतुकीवर आमचे विशेष लक्ष आहे.

संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *