facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / साहित्याच्या व्यासपीठावर ‘विदर्भ’ नको!

साहित्याच्या व्यासपीठावर ‘विदर्भ’ नको!

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – साहित्य संमेलनामधून स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला बळ मिळावे यासाठी काही वैदर्भीय कार्यकर्ते प्रयत्नशील असतानाच ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मात्र संवेदनशील मुद्दे दूर ठेवलेले बरे, असे मत मंगळवारी व्यक्त केले. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा साहित्याच्या व्यासपीठावर नको, असे ते म्हणाले.

‘स्वतंत्र विदर्भाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. साहित्याच्या व्यासपीठावर विदर्भाचा मुद्दा चर्चिला जायला नको. साहित्य संमेलन सुरळीत पार पाडायचे असेल तर संमेलनाच्या अध्यक्षांनीही त्यावर बोलून गोंधळ माजवणे योग्य नाही. माझे लक्ष्य संमेलन सुरळीत पार पाडणे आहे’, असे म्हणत डॉ. काळे यांनी या मुद्यावर अधिक बोलायचे टाळले.

विदर्भ साहित्य संघाच्या ६५व्या संमेलनात वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव मंजूर करण्यात न आल्यास संमेलन उधळून लावू, असा इशारा विदर्भ मुक्ती मोर्चाने चंद्रपूरच्या संमेलनाच्या निमित्ताने यावर्षाच्या प्रारंभी दिला होता.

संमेलनातील एका परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असणारे विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनीही आपल्या भाषणातून हा मुद्दा पुढे रेटला होता. ‘आपल्या माणसांचे संमेलन म्हणून आलो. पण, वेगळ्या विदर्भाशिवाय तरणोपाय नसल्याने संमेलनात वेगळ्या विदर्भाचा ठराव घ्यावा’, असा आग्रह त्यांनी धरला होता.

–संयुक्त महाराष्ट्राचा होता प्रस्ताव

बेळगाव येथे १९४६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संयुक्त महाराष्ट्राचा विषय चर्चेला आला होता. त्यावेळचे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार ‘वैदर्भीय’ ग. त्र्यं. माडखोलकर हे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनीच संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव त्यावेळी सादर केला होता. तर नागपुरात झालेल्या ८०व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा चावून चोथा झालेला मुद्दा असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर, विद्यमान संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या अविकासासाठी प्रत्येक सरकार जबाबदार आहे. या प्रदेशांवर कायम अन्याय झाला आहे. मात्र स्वतंत्र राज्य निर्माण करणे हा काही उपाय नाही, असे सांगत वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध दर्शविला होता.

–संमेलन सुरळीत पार पाडायचे असेल तर वाद वाढविणारे मुद्दे संमेलनाच्या व्यासपीठावर नकोत. अध्यक्ष या नात्याने या विषयावर मला काहीही बोलायचे नाही.
– डॉ. अक्षयकुमार काळे, संमेलनाध्यक्ष, ९०वेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *