facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / सीटवर रुमाल टाकून जागा अडविणाऱ्यांना चाप

सीटवर रुमाल टाकून जागा अडविणाऱ्यांना चाप

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सीट मिळवण्यासाठी सीटवर रुमाल किंवा वर्तमानपत्र टाकण्याच्या प्रकारामुळे होणाऱ्या वादावादीला आळा बसणार आहे. ‘रुमाल किंवा अन्य सामान टाकून सीट निश्चित करण्याचा प्रकार यापुढे बंद झाला पाहिजे. त्यासाठी संबंधित ड्रायव्हर, कंडक्टरने दक्षता बाळगावी,’ असा आदेश महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) दिला आहे.
एसटी महामंडळाच्या बसमध्ये एखादी वस्तू टाकून सीट निश्चित करणारे आणि गर्दीतून वाट काढत जागा मिळवणारे प्रवासी यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद होतात. अनेकदा या वादामुळे बस पोलिस स्टेशनलाही न्यावी लागते. त्यामुळे एसटीचा वेळ व पैसा वाया जातो, प्रवाशांचाही वेळ वाया जातो. हा प्रकार एसटीसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे वृत्त ‘मटा’ने नऊ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कल्याण येथील आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्याबाबत मागणी करणारे पत्र एसटी महामंडळाला दिले होते. त्यावर महामंड‍ळाने नुकताच निर्णय घेतला आहे. एसटी बस फलाटावर उभी करण्यापूर्वीच त्या बसच्या खिडक्यांच्या काचा आतून लावून घेणे किंवा प्रवाशांना दरवाजा व्यतिरिक्त शिरकाव करता येईल, अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबतचा लेखी आदेश राज्यातील सर्व आगारप्रमुखांना पाठवण्यात आला आहे.

एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी असल्यास पहिल्या स्टँडपासून प्रवासी किंवा त्यांचे नातेवाइक रुमालासह विविध प्रकारच्या वस्तू खिडकीतून सीटवर ठेवतात. अनेक जण गर्दीतून वाट काढत त्या सीटपर्यंत पोहोचतात; मात्र रुमाल टाकलेला पाहून तेथे बसणे टाळतात, तर काही जण रुमाल बाजूला करून त्या सीटवर बसतात. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रवाशांमध्ये वाद होतो. एसटी महामंडळाकडे प्रवाशांचे वाद आणि प्रवासी व कंडक्टरमधील वादाच्या घटनांची नोंद आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दादागिरी केली जाते. रुमाल टाकून सीट आरक्षित करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करणाऱ्या कंडक्टरना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिरूर, नारायणगावात महिला कंडक्टरना मारहाण झाल्याच्या घटना ताज्या आहेत. या प्रवृत्तींवर प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात आली होती.

खिडक्या बंद करण्याची सूचना

एसटी बस फलाटावर लावण्यापूर्वी त्या बसच्या सगळ्या खिडक्यांच्या काचा आतून लावून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक बसमध्ये खिडक्यांची आतील लॉक नादुरुस्त असतात. त्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती करून घेण्याची सूचना महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) केली आहे. तसेच, या आदेशाच्या कार्यवाहीचा अहवालही सर्व आगारप्रमुखांना महाव्यवस्थापकांना सादर करावा लागणार आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *