facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / पगार ९५ कोटींचा, पाठवले फक्त दीड कोटी!

पगार ९५ कोटींचा, पाठवले फक्त दीड कोटी!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार करण्यासाठी ९५ कोटी रुपये हवे आहेत, असे आम्ही रिझर्व्ह बँकेला लेखी कळवले होते. परंतु, त्यांनी आमच्याकडे केवळ एक कोटी ५८ लाख रुपयांची नव्या चलनातील रोकड पाठवली आहे. मग आम्ही सर्व शिक्षकांना पैसे कसे पुरवणार? प्रत्येक शिक्षकामागे अवघे नऊशे रुपये आहेत. एवढ्या कमी पैशांत शिक्षकांचे भागेल का? अशी व्यथा सोलापूर जिल्हा ‌मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली.

नोटबंदीच्या निर्णयानंतर काही दिवसांनी रिझर्व्ह बँकेने अचानक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कोणतेही व्यवहार करण्यास मनाई करणारे परिपत्रक काढले. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला याचिकांद्वारे आव्हान दिले आहे. यावरील पुढची सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे झाली.

सोलापूरच्या बँकेतर्फे अॅड. विजय थोरात यांनी शिक्षकांच्या पगाराबाबतची व्यथा मांडली. तर सोलापूर बँकेकडे आम्ही एक कोटी ५८ लाख रुपये पाठवलेले आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांना शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यात जमा करायचे असतील किंवा त्यांना धनादेशाद्वारे द्यायचे असतील तर ते संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जाऊ शकतात. त्यात सोलापूर बँकेला कुठेही अडथळे नाहीत, असे रिझर्व्ह बँकेतर्फे अॅड. व्यंकटेश धोंड यांनी सांगितले. त्याचवेळी केवळ सोलापुर नव्हे अन्य जिल्हा मध्यवर्ती बँकांनाही पैशांची गरज आहे, असे कोल्हापूर बँकेतर्फे अॅड. एस. एस. पटवर्धन यांनी सांगितले. मात्र, हा विषय आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणीला असून उच्च न्यायालयांतील अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याविषयी निर्णयाची शक्यता आहे, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी दिली. त्यामुळे खंडपीठाने या याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली. मात्र, वकिलांनी शुक्रवारच्या तारखेसाठी विनंती केली असता, ‘जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांना सुनावणीसाठी परवानगी देणारा आदेश गुरुवारी काढला तर तुम्ही विनंती अर्ज करा, मग आम्ही शुक्रवारी सुनावणी घेऊ’, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *