facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / पाय खेचणे बंद करा

पाय खेचणे बंद करा

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – पक्षाच्या नेत्यांनी परस्परांचे उणेदुणे काढून पाय खेचण्याऐवजी एकाही आश्वासनांची पूर्ती न करणाऱ्या भाजप-शिवसेनेचे पाय खेचावेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्थानिक नेत्यांचे कान टोचले.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक काँग्रेस व एनएसयूआयच्यावतीने मंगळवारी देशपांडे सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे प्रमुख पाहुणे होते. कियारा राय हिच्या हस्ते केक कापण्यात आला.

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, आमदार अनंत गाडगीळ, ​आमदार सुनील केदार, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार​ नीतेश राणे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे पाटील, युवकचे प्रदेश सरचिटणीस कुणाल राऊत, किशोर जिचकार, कांता पराते, विक्रम संतोषवार, अजय हिवरकर उपस्थित होते. सर्वांनी मतभेद विसरून २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुकीत ​पक्षाला विजयी करण्याचा निर्धार करावा, असा सूर नेत्यांनी व्यक्त केला. चतुर्वेदी यांना ​डी.लिट्. मिळाल्याबद्दल युवक काँग्रेसचे नागपूरचे अध्यक्ष बंटी शेळके, रामटेकचे अध्यक्ष अनिल राय, प्रदेश प्रवक्ते धीरज पांडे यांनी त्यांचा जंगी सत्कार केला.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर बांधणी करायला नको का? पक्षाला आपण किती वेळ देतो. पक्ष संकटात असताना वेळ द्यायचा नाही आणि पदासाठी दिल्लीत स्पर्धा असते. भाजपच्या कामाची, नोटाबंदीच्या त्रासाची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे भाषणे देऊन होणार नाही, तर आपण किती लायक आहोत, हे काम नेते व कार्यकर्त्यांनी करावे. एकेकाळी २०० आमदार असणाऱ्या पक्षाचे ४२ आमदार कसे झाले? सोनिया गांधी, राहुल गांधी की तुमच्या आमच्यामुळे याचाही विचार करा, असे बौद्धिकही राणे यांनी दिले. प्रास्ताविक आमदार सुनील केदार यांनी केले.

परत गटबाजी

गटबाजी दूर करावी, अशी सूचना वक्त्यांनी केली पण, या मेळाव्यापासून केंद्रीय कार्यसमिती सदस्य विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दूर ठेवण्यात आले. २ ऑक्टोबरला चतुर्वेदी, राऊत समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर मुत्तेमवार समर्थकांनी १९ नोव्हेंबरला कच्छीविसा मैदानात शक्तिप्रदर्शन केले. आता पश्चिम नागपुरात मेळावा घेऊन गटबाजी चव्हाट्यावर आणली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *