facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / बेशिस्तांची नाकाबंदी

बेशिस्तांची नाकाबंदी

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळण्यासाठी शहर पोलिसांनी नाकाबंदीची मोहीम हाती घेतली आहे. शहरात सर्वच भागात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा रस्त्यावर उतरला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरात प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस थांबणार असेल तरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करायचे असा जणू काही पायंडाच पडला आहे. काही बहाद्दर तर पोलिसांच्या नाकावर टिचून बेदरकारपणे वाहने चालवितात. अशा वाहनधारकांना अडविल्यानंतर अरेरावीपर्यंत इतकेच नव्हे तर पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत बेशिस्त वाहनधारकांची मजल जाऊ लागली आहे. याखेरीज शहरात काही दिवसांत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचे दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार वाढू लागल्याने चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळणे पोलिसांपुढे आव्हान ठरू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात काही दिवसांपासून ठराविक ठिकाणी नाकाबंदी केली जात होती. परंतु, तरीही चेन स्नॅचर्स मोकाटच असल्याने आता शहराच्या बहुतांश भागात पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली आहे.

वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी वारंवार केले आहे. सर्वप्रथम पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे, असे आवाहन करूनही शहरात बहुतांश वाहनधारक हेल्मेटशिवायच वाहने चालवित असल्याचे पहावयास मिळते आहे. अशा वाहनधारकांवर प्राधान्याने कारवाई करण्यात येते असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.

संशयास्पद वाहनांची होणार तपासणी
रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे. चेन स्नॅचिंग करून पसार होणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठीही पोलिस सरसावले आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत असून ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. परवाना तसेच परमीट नसतानाही प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात येत आहे.

शहरात सर्वत्र मोहीम तीव्र
वाहनांची तपासणी करून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करणे ही पोलिसांच्या वाहतूक विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी कारवाया करीतच आहेत. परंतु, त्याचबरोबर पोलिस स्टेशन्सचे निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक या दर्जाचे अधिकारी देखील कारवायांसाठी आपापल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर उतरल्याचे बुधवारी पहावयास मिळाले. म्हसरुळपासून श्रमिनगरपर्यंत आणि नाशिकरोडपासून अंबड लिंकरोडपर्यंत शहरातील बहुतांश भागात वाहन तपासणी सुरू असल्याचे दिसत आहे.

वाहतूक पोलिसांकडून प्रबोधन
नागरिकांनी स्वत:च्या रक्षणासाठी हेल्मेट परिधान करावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईही सुरू आहे. परंतु, अजूनही अनेक लोक हेल्मेटविनाच वाहने चालवित असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वी सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेटचा वापर करा. अन्यथा उद्यापासून कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास आम्ही सुरूवात करणार आहोत. ५०० रुपये दंड भरण्यास तयार रहा, असा इशाराच पोलिस देत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *