facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘वसुंधरा महोत्सवा’त नदीबचावाचा जागर

‘वसुंधरा महोत्सवा’त नदीबचावाचा जागर

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – पर्यावरणाचे विविध पैलू उलगडणारे लघुपट, छायाचित्र प्रदर्शन, चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व्याख्याने आदी कार्यक्रमांची रेलचेल असलेला ‘‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ४ ते ११ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ‘सेव्ह रिव्हर; सेव्ह लाइफ’ ही महोत्सवाची संकल्पना आहे.
‘भारतीय संस्कृतीमध्ये नदीला जीवनदायिनीचे स्थान देण्यात आले आहे. नदीकाठीच अनेक संस्कृती रूजल्या आणि वाढल्या. मात्र, आज भौतिक विकास साधताना नद्या आकसत आहेत. अनेक नद्या मरणासान्न अवस्थेत आहेत, तर काहींना गटारगंगांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजात जागरूकता निर्माण करून लोकसहभागातून नदीला पुनर्जन्म देणारी चळवळ उभारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात नद्यांना वाचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे यंदा अकरावे वर्ष असून, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्था सहभागी होणार आहेत. आठ दिवसांच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपटांबरोबरच इको बाजार, छायाचित्र प्रदर्शन, मार्गदर्शनपर चर्चासत्र, नदी संवर्धनासंदर्भातील कार्यशाळा, पर्यावरण स्नेही साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान, विद्यार्थ्यांची पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अर्काइव्ह थिएटर, प्रभात रोड आणि किर्लोस्कर कॅम्पसमध्ये कार्यक्रम होणार असून, २० डिसेंबरपासून मोफत प्रवेशिकांचे वाटप सुरू होईल, असे चित्राव म्हणाले. अधिक माहितीसाठी संपर्क : www.kirloskarvasundharafest.in

डॉ. आमटेंना वसुंधरा सन्मान
पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान यंदा डॉ. विकास आमटे यांना जाहीर झाला आहे. बहुपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. आमटे यांनी आनंदवनातील कुष्ठरोग निर्मूलनाबरोबरच पर्यावरण क्षेत्रात भरीव काम केले आहे. आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्पामध्ये केलेल्या कृत्रिम तळ्यांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. रहिवाशांच्या सहभागातून प्लास्टिक आणि वापरलेल्या टायरच्या साह्याने छोटे बंधारे, इमारतींचा पाया आणि रस्त्यांची निर्मिती त्यांनी केली आहे, असे चित्राव म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *