facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / सावधान, शहर विद्रूप कराल तर…!

सावधान, शहर विद्रूप कराल तर…!

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – महापालिकेच्या जागेवर बॅनर आणि फ्लेक्सबाजी करून स्वस्त साधनांद्वारे तुम्ही स्वत:ची प्रतिमा अधिक उजळू पहात असाल तर सावधान. अशा प्रकारची फ्लेक्सबाजी शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरत असल्याचा ठपका ठेवत कोर्टाने शहरातील एका माजी नगरसेवकाला एक हजार रुपये दंड किंवा दहा दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अशा प्रकरणात शिक्षा सुनावण्याची ही शहरातील पहिलीच घटना असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने दिलेला हा निर्णय बॅनरबाजी करणाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा ठरणार आहे.

सन २००२ मध्ये अमोल जाधव यांनी नगरसेवकपदासाठी महापालिकेची निवडणूक लढवली होती. २५ जानेवारी २००२ रोजी सकाळी प्रभाग क्र. १९ मध्ये वडाळागावातील खंडोबा चौकात त्यांनी महापालिकेच्या मालकीच्या जागेवर निवडणूक चिन्ह, फोटो आणि निवडणुकीत निवडून देण्याविषयीचा मजकूर असलेला कापडी बोर्ड लावला होता. मात्र महापालिकेची परवानगी घेण्यात आली नाही. या प्रकरणी भ्रदकाली पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (दि. १४) रोजी प्रथम न्यायदंडाधिकारी अ. मो. शाह यांच्या कोर्टात झाली. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील जी. डी. सोनवणे यांनी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी असे चार साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून कोर्टाने जाधव यांना शहरामध्ये फलक लावून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचविल्याप्रकरणी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दहा दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निर्णयाने बसणार इतरांना चाप

या खटल्याचा निकाल तब्बल १४ वर्षांनी लागला आहे. माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्यावर विनापरवानगी फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला. कोर्टाने ठोठावलेली शिक्षा सौम्य असली तरी यापुढे विनापरवानगी सरकारी जागेत फलक, फ्लेक्स लावण्याचा प्रकारांना चाप बसण्यास मदत होणार आहे. महापालिकेची परवानगी न घेता अशा प्रकारे शहर विद्रुप करणे यापुढे महागात पडणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *