facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नागपूर / आराखडा, गावविकासाचा नाही!

आराखडा, गावविकासाचा नाही!

सेवाग्रामचा विकास बोलले जात असताना गाव मात्र वंचित राहते. गाव आणि आश्रम यात मोठी दरी निर्माण होते. आश्रमाच्या पलीकडे गाव आहे याचा विसर सर्वांना पडतो. गावात प्रवेश करण्यास आश्रमासमोरून येणारा एकच मार्ग आहे. व्हीआयपींसाठी हा मार्ग अनेकदा बंद केला जातो. गावकऱ्यांचे हाल होतात. बायपास तयार करणे आवश्यक आहे. पण, याचा आराखड्यात उल्लेखच नाही. त्यामुळे हा विकास आराखडा आमच्या विकासाचा नाही, असा संताप गावकरी व्यक्त करीत आहेत. तर आराखड्याच्या कामाचा सध्याचा वेग पाहता २०१९च्या दीडशेव्या गांधी जयंतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य असल्याचाही आरोप होत आहे.

बापूंच्या मूलभूत तत्त्व विचारांचे दिशादर्शन व्हावे म्हणून आघाडी सरकारच्या काळात ४९५ कोटी रुपयांचा ‘गांधी फॉर टूमॉरो’ मंजूर करण्यात आला. सरकार बदलताच याचे नामकरन ‘सेवाग्राम विकास आराखडा’ असे करण्यात आले. निधी कपात करीत २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. गांधी जयंतीचे औचित्य साधत ४० कोटींना मंजुरीही दिली. वर्धा, सेवाग्राम व पवनार या तिन्ही स्थळांचा ऐतिहासिक वारसा म्हणून विकास गृहीत धरला गेला आहे. या प्रकल्पामुळे गांधीजींचा निर्वाणीचा लढा १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाशी जोडला जावून त्यांच्या वैयक्तिक, राजकीय आणि विकासात्मक पैलूंची ओळख जगाला करून दिली जाईल. पण, मूळ गावात आराखड्यातील विकास दिसणे अपेक्षित असताना पांधण रस्ते तयार करणे, नाला बांधकाम, तलावाचे खोलीकरण, पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मत सरपंच रोषणा जामलेकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रकल्प काय?

गांधी विचारांची कास धरून सत्य, अहिंसा, त्याग-सद्‍भाव या विचारत्रयींची पुनःस्थापना करण्यासाठी सेवाग्राम आश्रम परिसरासोबतच वर्धा शहराचा व पवनार आश्रम परिसराचा विकास करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. गांधीजींची बापू कुटी किंवा आश्रमातील इतर सर्व कुटी कायम राहणार आहेत. आश्रम परिसराबाहेर शासनाने अधिग्रहित व प्रकल्पाकरिता खरेदी केलेल्या सहा हेक्टर परिसरात विविध केंद्रे व कायम प्रदर्शन राहणार आहेत. त्यातून गांधींचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक, तंत्रविज्ञान, आध्यात्म-अहिंसा, उद्योग हे विचारच प्रक्षेपित होतील. या संकल्पनेवर आधारित शोध व संशोधन केंद्रही उभारले जाणार आहे. गांधी रिसोर्स सेंटर हे महत्त्वाचे आहे. मुंबईच्या नीना आघारकर यांनी या आराखड्याचे डिझाइन तयार केले आहे.

सेवाग्राम विकास आराखड्याचे काम याच गतीने होत राहिले तर दीडशेव्या गांधी जयंतीचे औचित्य साधले जाईल असे वाटत नाही. हा सर्व विकास आराखडा आश्रम परिसराबाहेरच कार्यान्वित होणार असल्याने आश्रमाची भूमिका केवळ मागितले ते सहकार्य आणि मार्गदर्शकाची आहे. आराखड्याचे कार्यान्वय आणि अंमलबजावणी शासन अधिकारी करणार आहेत.
– श्रीराम जाधव, सचिव, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान

विकासाचे टप्पे

-नागपूर-वर्धा-सेवाग्राम सरळ मार्गाने जोडून पहिला टप्पा अमलात आला आहे. यात विमान मार्ग, रस्ते मार्गाचा समावेश आहे. याचे केंद्र नागपूर आहे.
-वर्धा सेवाग्राम-पवनार अशा तिन्ही ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी ‘स्वराज्य फेरी’ हा ‘ऐतिहासिक पथ’ तयार करण्यात येणार आहे. यात सेवाग्राम आश्रम, नई तालिम परिसरासह सुमारे २८ स्थळांचा समावेश आहे.
-गांधींच्या पर्यावरणीय दृष्ट‌िकोनाचा विस्तार वैविध्यपूर्ण रचनेतून करण्यात येणार आहे. ३० प्रोजेक्टरच्या आधारे लेसरच्या माध्यमातून संगणकीय पद्धतीने ‘उद्यासाठी गांधी’चे प्रात्यक्षिक पर्यटकांना अनुभवता येणार आहे. गांधींच्या विचार तत्वाच्या सहा संकल्पना विचारात घेण्यात आल्या आहेत.
-चवथ्या टप्प्यात खादी ग्रामोद्योग, ग्रामीण कारागीर, कौशल्यपूर्ण करणे आदींसाठी वर्ध्यातील गांधी विचारधारेवर चालणाऱ्या ग्राम विज्ञान केंद्र व महात्मा गांधी ग्रामीण प्राद्योगिक संस्थानचे सहाय्य घेण्यात येणार आहे. खादी, आरोग्यदायक वस्तू, चर्मवस्तू, हस्तशिल्प, सर्जनात्मक, शैक्षणिक वस्तूंचे निर्माण करून ‘इको फ्रेंडली’ प्रणाली विकसित होण्यास हातभार लागणार आहे.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *