facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / पोलिसांची दादागिरी; एसटी गरीब बिचारी!

पोलिसांची दादागिरी; एसटी गरीब बिचारी!

पोलिसांच्या वाहनाबरोबर अपघात झाल्याची जबर किंमत एसटी महामंडळाला चुकवावी लागत आहे. अपघातानंतर पोलिसांनी एसटीची शिवनेरी बस ताब्यात घेतली. त्यावर कडी करीत अपघातग्रस्त पोलिस व्हॅन दुरुस्त करण्याचे फर्मान सोडले. एसटी महामंडळानेही पोलिसांच्या वाहनाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू केली आहे. दरम्यान, शिवनेरी बस बंद असल्यामुळे एसटीला रोज ३५ हजार रुपयांचा फटका बसत आहे.
पुण्याहून औरंगाबादला येणारी शिवनेरी बस (क्रमांक एमएच २० एस ९४३०) आणि पोलिसांची टू मोबाइल व्हॅन (क्रमांक एमएच २० सीयू ००८४) यांचा ९ डिसेंबर रोजी दहेगाव बंगल्याजवळ (ता. गंगापूर) रात्री दोनच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पोलिस व्हॅन तीन वेळा उलटून पडली. व्हॅनमधील तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी शिवनेरीचे चालक संतोष कोलते यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शिवनेरी बस वाळूज पोलिस ठाण्यात आणली. त्याच दिवशी दुपारी एसटीचे पथक बस ताब्यात घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले, पण ‘तपास बाकी आहे,’ असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले.
काही दिवसानंतर एसटीचे पथक पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळीही बस एसटी महामंडळाकडे सोपविण्यात आली नाही. ‘आमची टू मोबाईल व्हॅन आधी दुरुस्त करून द्या. मगच शिवनेरी बस परत घेऊन जा,’ असे त्यावेळी पोलिसांनी तोंडी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त व्हॅन एसटी कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठविली. या व्हॅनच्या दुरुस्तीचे काम एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत सुरू आहे.
पोलिसांची वाहने दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोटार वाहन विभाग असताना अपघातग्रस्त व्हॅन एसटीकडून दुरुस्त करून घेतली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत एसटी विभागाचे अधिकारीही काहीही सांगण्यास तयार नाहीत, मात्र अपघातग्रस्त व्हॅनच्या दुरुस्तीचे काम एसटीच्या कार्यशाळेत युद्धपातळीवर सुरू आहे.

रोज ३५ हजारांचा फटका
औरंगाबाद मध्यवर्ती आगाराकडे सहा व्होल्व्हो बस आहेत. दोन बस वेरूळ आणि अजिंठा येथे पर्यटकांसाठी पाठविण्यात येतात. उर्वरित चारपैकी एक बस मुंबईला पाठविली जाते. औरंगाबाद-पुणे मार्गावर तीन बस चालविण्यात येतात. एक बस पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे औरंगाबाद-पुणे मार्गावरील चार फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे एसटीला रोज ३५ हजार रुपयांचा फटका बसत आहे. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होत आहे.

अपघातग्रस्त वाहनांची आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी केलेली नाही. यामुळे ही बस पोलिस ठाण्यासमोर उभी करण्यात आली आहे. मोबाइल व्हॅन दुरुस्त करण्याचे काम पुण्याला होते. त्याचा औरंगाबादशी संबंध नाही. आरटीओच्या तपासणीनंतर ही गाडी परत एसटीला परत देण्यात येईल.
– मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, वाळूज पोलिस स्टेशन, औरंगाबाद.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *