facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / नाशिक / फार्मसी कॉलेजातही मिळणार जेनेरिक औषधे

फार्मसी कॉलेजातही मिळणार जेनेरिक औषधे

रामायणकालीन आपत्कालीन प्रसंगात अचाट बलाने दिव्य संजीवनी आणण्याचा भीमपराक्रम करणाऱ्या महाबली हनुमंताचे जन्मस्थान अंजनेरी पर्वताच्या कुशीतील जनतेला आता फार्मसी कॉलेजमधून स्वस्तातील जेनेरिक औषधे मिळणार आहेत. बाजारपेठेतील इतर औषधांच्या तुलनेत या औषधांच्या किमती सुमारे ७० टक्क्यांनी कमी असतील, असा दावाही करण्यात येत आहे. शिवाय फार्मसी कॉलेजमध्ये जेनेरिक औषध वितरणाचे केंद्र सुरू करण्याचा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्यांदाच राबविला आहे.

नाशिकनजीक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी डोंगराच्या कुशीत त्र्यंबकेश्वरसह आदिवासी परिसर मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी औषधोपचारांसाठी ग्रामस्थांना शहर गाठण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेती व मजुरी करणाऱ्या या ग्रामस्थांसाठी अनेकदा जीवनदायी महागडी औषधे विकत घेणेही आवाक्याबाहेर असते. परिसरातील ही परिस्थिती लक्षात घेत सपकाळ नॉलेज हबच्या फार्मसी कॉलेजने प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासंदर्भातील प्रस्तावास सरकारच्या विविध संबंधित विभाग आणि मंत्रालयाच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. यामुळे आता लवकरच अंजनेरीसारख्या दुर्गम भागात कार्यरत फार्मसी कॉलेजमधून नागरिकांना अल्प दरातील जेनेरिक औषधे उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रवींद्रनाथ सौदागर यांनी दिली.

या केंद्रासाठी ‘बीपीपीआय’, ‘डीपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स’, ‘मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स आणि फर्टिलायझर्स’, ‘भारत सरकार’, ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’ यांच्या निर्देशानुसार व ‘अन्न व औषध प्रशासन विभाग’, महाराष्ट्र राज्य या संस्थांच्या परवानग्या या केंद्रस्थापनेसाठी मिळाल्याचे डॉ. सौदागर यांनी सांगितले.

७० टक्क्यांपर्यंत किमतीत फरक

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेंतर्गत बाजारपेठेतील औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधे तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी दराने मिळू शकतील, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. जेनेरिक औषध केंद्रांची उपलब्धता प्रामुख्याने शहरी वस्तीत जास्त प्रमाणात आहे. दुर्गम भागात व त्यातही फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून अशी केंद्रे अपवादानेच आढळतात. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.

काय आहेत जेनेरिक औषधे?

औषधांचे मूळ नाव धारण करून बाजारपेठेत दाखल होणारी औषधे प्रामुख्याने या गटात मोडतात. ब्रँडेड व जेनेरिक औषधांचे गुणधर्म एकच असले तरीही केवळ मार्केटिंग, अॅडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंगसारख्या विक्रीवर्धक साखळीत जेनेरिक उत्पादने अडकत नसल्याने ही औषधे अन्य औषधांपेक्षा सुमारे ३० ते ७० टक्क्यांनी स्वस्त मिळतात.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *