facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / मुंबई / सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे

सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील पुणे व लातूर जिल्ह्यातील १४ नगर परिषदांच्या ‌निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या टप्प्याप्रमाणेच या निकालातही नगराध्यक्षपदांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र नगरसेवकांच्या संख्येत भाजपला राष्ट्रवादीने मागे टाकले आहे. तसेच २०११मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूक निकालांच्या तुलनेत भाजपला मोठे यश मिळाल्याचे दिसत असले तरी २०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या तुलनेत या निवडणुकीत मोठी घट झाल्याचेही दिसते आहे.

पुणे व लातूर जिल्ह्यांमधील १४ नगरपालिकांपैकी पाच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यापाठोपाठ पक्षाच्या चिन्हावर दोन व आघाडीचा एक अशा तीन ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आले. ‌शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले असून, काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष निवडून आले. तथापि, एकूण ३२४ नगरसेवकांच्या जागांपैकी ९३ ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजपला ८१ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस ४५ तर, ‌शिवसेनेचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत.

बारामतीत राष्ट्रवादीला पाणी पाजण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांचे मनसुबे राष्ट्रवादीचे नेते अ‌जित पवार यांनी धुळीस मिळविले आहेत. बारामतीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आला असून ३९ पैकी ३५ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.

दौंडमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची संख्या जास्त असली तरी तेथे राहूल कुल यांच्या नागरिक हित आघाड‌ीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. तशीच परिस्थिती इंदापूरमध्ये असून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे संख्याबळ एकने अधिक असले तरी तेथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरची सत्ता राखण्यात दमछाक झाल्याचे दिसून आले. अहमदपूरला तुलनेने राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिक असले तरी तेथे स्थानिक बहुजन विकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये मात्र एमआयएमचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. एमआयएममुळे उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदू आणि मुस्लिम मतांचे धृवीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने काँग्रेसला फटका बसला असून त्याचा फायदा भाजपला झाला आहे. तर ओवैसी यांचे जन्मगाव असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका राष्ट्रवादीने काँग्रेसकडून खेचून आणली आहे. इथेही एमआयएमने मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही.

पुणे जिल्ह्यातील आळंदी नगर परिषदेत भाजपने शिवसेनेला धूळ चारली असून, सेनेच्या ताब्यातील तेथील सत्ता भाजपने हस्तगत केली आहे. लोणावळा आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद भाजपने आपल्या कब्जात ठेवली असली तरी शिरूरला भाजप नेते बाबुराव पाचारणे यांना शहर विकास आघाडीने धक्का दिला आहे. सासवड आणि जेजुरी नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नांना मतदारांनी साथ दिली नाही. जेजुरीला काँग्रेसचा तर सासवडला जनमत विकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला. शिवसेनेला जुन्नरचे एकमेव नगराध्यक्षपद मिळाले आहे.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यातील निलंगा नगर परिषद भाजपने ताब्यात घेतली आहे. कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी आपल्या आजोबांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पॅनलला पराभूत केले. १४ ठिकाणच्या नगर परिषदांच्या ३२४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९३, भाजपचे ८१, काँग्रेसचे ४५, शिवसेनेचे २३, एमआयएम ६, राज्यात निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या पक्षाचे ३६, अपक्ष २६ आणि अन्य स्थानिक आघाड्यांचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत.

जेजुरी नगरपालिका राष्ट्रवादीकडून काँग्रेसने खेचली असून लातूर जिल्ह्यातील औसा राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे आली आहे. भाजपने काँग्रेसकडून लोणावळा, निलंगा, उमरगा या नगरपालिका जिंकल्या असून राष्ट्रवादीकडून तळेगाव दाभाडे जिंकली आहे.

पक्षीय बलाबल

पक्ष नगराध्यक्ष

भाजप ५

राष्ट्रवादी काँग‍्रेस + आघाडी ३

काँग्रेस २

शिवसेना १

अन्य ३

एकूण १४

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *