facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / डॉ. कुंबळेची बँक खाती तपासणार

डॉ. कुंबळेची बँक खाती तपासणार

क्लिनिकमध्येच बनावट नोटांचा छापखाना थाटणारा डॉक्टर सुधीर रावसाहेब कुंबळे (वय ३३, रा. एव्हरग्रीन होम्स, नागाळा पार्क) याच्या बँक खात्यांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी बँकांशी पत्रव्यवहार केला आहे. सोमवारी (ता. १९) बँक खात्यांची तपासणी होणार आहे, तर डॉ. कुंबळे याने नोटा छापण्यासाठी राजारामपुरीतील लक्ष्मी कॉम्प्युटर या दुकानातून प्रिंटर खरेदी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, डॉ. कुंबळे याची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी (ता. १९) संपत आहे.

पेशाने डॉक्टर असलेल्या सुधीर कुंबळे याने हव्यासापोटी बनावट नोटा छापून बाजारात खपवण्याचे नियोजन केल्यानंतर त्याने या कामात गोपनीयता बाळगली. दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेला प्रिंटर आणि स्कॅनरचा यासाठी त्याने शिताफीने वापर केला. हा प्रिंटर त्याने दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी येथील बी. टी. कॉलेजच्या समोरील लक्ष्मी कॉम्प्युटर या दुकनातून खरेदी केला होता. पोलिसांनी रविवारी याची चौकशी केली असून, प्रिंटरचा वापर कधीपासून केला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. डॉ. कुंबळे याने ११ महिन्यांपूर्वीच इनोव्हा कार खरेदी केली आहे. नागाळा पार्क येथील फ्लॅट मात्र त्याच्या वडिलांच्या नावे आहे. कोल्हापुरात केवळ ७ ते ८ महिनेच क्लिनिक चालवून त्याच्याकडे आलेल्या पैशांबाबत शंका आहे, त्यामुळे त्याच्या दोन्ही बँक खात्यांची तपासणी होणार आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी यासाठी दसरा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखांना पत्र दिले आहे. सोमवारी (ता. १९) दोन्ही बँकांमधील खात्यांची तपासणी केली जाणार आहे.

डॉ. सुधीर कुंबळे हा दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात आला, मात्र या कालावधीत त्याने केवळ ७ ते ८ महिनेच क्लिन‌िक चालवले. सुरुवातीला कनाननगर परिसरात त्याचे क्लिनिक होते. नोव्हेंबर महिन्यात हे क्लिनिक बंद करून त्याने खानविलकर पेट्रोल पंपासमोर नवीन क्लिनिकसाठी प्रयत्न सुरू केले. भाड्याने जागा घेऊन क्लिन‌िक सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात होते. दोन वर्षांच्या काळात केवळ ७ ते ८ महिनेच काम करूनही महागडी कार खरेदी केल्यामुळे त्याने यासाठी पैसा कुठून आणला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी डॉ. कुंबळे याच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासण्याचेही काम सुरू केले आहे.

आज संपणार पोलिस कोठडी

बनावट नोटा खपवताना अटक केलेला संशयित डॉ सुधीर कुंबळे याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. दरम्यान, त्याच्याकडील प्रिंटर, स्कॅनर, कटर आणि १७ हजार रुपयांच्या बनावट नोटाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *