facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / नेवाशाच्या प्राचीन संस्कृतीवर पडणार प्रकाश

नेवाशाच्या प्राचीन संस्कृतीवर पडणार प्रकाश

नेवासा येथील प्राचीन व मध्ययुगीन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे उत्खनन ६० वर्षांपूर्वी करण्यात आले होते. हा अहवाल इंग्रजी भाषेतून प्रकाशित झाल्यामुळे कमी संशोधकांपर्यंत पोचला. आता हा अहवाल मराठीत अनुवादित करून राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुस्तक प्रकाशित करणार आहे. या उपक्रमाद्वारे संशोधक आणि जाणकारांना ‘फ्रॉम हिस्ट्री टू प्री-हिस्ट्री अॅट नेवासा’ हा मौलिक मराठी ग्रंथ उपलब्ध होणार आहे.
नेवासा येथे १९५४ ते ५६ या कालावधीत डॉ. एच. डी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शां. भा. देव, डॉ. झै. दा. अन्सारी, डॉ. सोफिया इहर्डट यांनी उत्खनन केले. हा अहवाल ‘फ्रॉम हिस्ट्री टू प्री-हिस्ट्री अॅट नेवासा’ या नावाने प्रकाशित झाला. इंग्रजी अहवाल मराठीत भाषांतरीत करण्याचा प्रस्ताव भेंडे (ता. नेवासा) येथील जिजामाता शास्त्र कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाला दिला होता. या प्रस्तावाला मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आणि इतर सदस्यांनी नुकतीच मंजुरी दिली. या ग्रंथाचे भाषांतर पुणे येथील दिलीप चव्हाण करणार आहेत. ‘फ्रॉम हिस्ट्री टू प्री-हिस्ट्री अॅट नेवासा’ हा अहवाल डेक्कन कॉलेजचे पहिले प्रकाशन आहे. हा अहवाल म्हणजे इंग्रजीतील साडेपाचशे पानांचा ग्रंथ आहे. ऑगस्ट १९६०मध्ये अहवालाच्या पाचशे प्रती प्रकाशित झाल्या होत्या. नेवाशात सापडलेल्या वस्तूंच्या नोंदी अहवालात आहेत. या वस्तूंच्या आधारे नेवाशाच्या ज्ञात इतिहासापासून प्रागैतिहासिक काळापर्यंतचा शोध घेण्यात आला आहे. हा अहवाल विदेशात पोचला असला, तरी महाराष्ट्रात प्रती सापडत नाहीत. काही विदेशी विद्यापीठाच्या ग्रंथालयांच्या वेबसाइट आणि डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियावर अहवाल उपलब्ध आहे. नेवाशातील उत्खननाची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळावर प्रकाश टाकण्यासाठी लाडमोड टेकडीवर उत्खनन व्हावे म्हणून तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी प्रयत्न केले होते. उत्खनन करण्यापूर्वी डॉ. सांकलिया आणि डॉ. इरावती कर्वे यांनी प्रवरा खोऱ्याची पाहणी केली होती. या कामात अनेक संशोधक, विद्वान, स्थानिक जाणकारांनी सहकार्य केले. ‘फ्रॉम हिस्ट्री टू प्री-हिस्ट्री अॅट नेवासा’ या अहवालात ही माहिती आहे. उत्खननात पाच संस्कृतीचे अवशेष सापडले. तांत्रिक परिभाषा, उत्खननातील वस्तूंची छायाचित्रे, निष्कर्ष भूतकाळाची शास्त्रशुद्ध माहिती देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीवर प्रकाश पडला आहे.

भाषांतरासाठी प्रयत्न
नेवासा येथील उत्खननाचे महत्त्व मराठी ग्रंथातून अधिक वाचकांपर्यंत पोहचणार आहे. हा ग्रंथ पुरातत्त्व, प्राच्यविद्या, सांस्कृतिक अभ्यास, साहित्य, सामाजिकशास्त्रे, इतिहास आदी विषयात मराठी भाषेतून संशोधन करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. या उद्देशाने अहवाल मराठीत आणण्याचा प्रस्ताव प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी दिला होता. विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने नेवासा परिसरातील सांस्कृतिक अभ्यासावर प्रा. लांडगे संशोधन करीत आहेत.

६० वर्षांपूर्वी नेवासा येथे उत्खनन करून ‘फ्रॉम हिस्ट्री टू प्री-हिस्ट्री अॅट नेवासा’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ अधिक वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी मराठीत भाषांतरीत करण्यात येणार आहे. प्राचीन संस्कृतीवर प्रकाश टाकण्याचा साहित्य-संस्कृती मंडळाचा प्रयत्न आहे.
– बाबा भांड, अध्यक्ष, राज्य साहित्य संस्कृती मंडळ

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *