facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / कचरागाड्यांची खरेदी

कचरागाड्यांची खरेदी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगर शहरातील कचरा संकलनाच्या खासगीकरणाची महापालिकेची तयारी असली तरी या कामासाठी कोणी ठेकेदार पुढे नसल्याने अखेर महापालिकेनेच या कामाच्या सक्षमीकरणाचा निर्णय घेतला आहे. सुमारे ७ कोटी रुपये खर्चून कचरा संकलनाची वाहने व अन्य साहित्य घेतले जाणार आहे. भविष्यात कचरा संकलन खासगीकरणातून दिले गेले तर ही वाहने संबंधित ठेकेदाराने वापरणे बंधनकारक केले जाणार आहे.

नगर शहरात रोज तयार होणारा सुमारे १२५ टन कचरा बुरुडगाव कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्यासाठी सध्या महापालिकेची यंत्रणा आहे. यासाठी सुमारे ५० वाहने सध्या कार्यरत आहेत. यापैकी काही महापालिकेची आहेत, तर काही खासगी ठेकेदारांची लावली गेली आहेत. मात्र, १४व्या वित्त आयोगातील निम्मी रक्कम घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक स्वच्छतेवर खर्च करण्याची बंधने असल्याने मनपाने ७ कोटी रुपयांतून नव्या घंटागाड्यांसह १५० कचरा कंटेनर व अन्य साहित्य घेण्याचे ठरवले आहे. मनपाच्या महासभेत या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या साहित्याच्या उपलब्धतेनंतर शहराच्या प्रत्येक वॉर्डात पुरेसे कचरा कंटेनर उपलब्ध होऊ शकणार आहेत.

निविदेला प्रतिसाद नाही

महापालिकेने आधी केवळ सावेडी प्रभाग समितीमधील कचरा संकलनाचे खासगीकरण करण्याचे ठरवले होते. पण ही प्रक्रिया निविदास्तरावर आल्यानंतर त्याला विरोध झाला व सर्व शहरासाठी असे कचरा संकलन खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले गेले. यानुसार प्रशासनाने कार्यवाही केली. पण या निविदेस प्रतिसादच मिळालेला नाही. महापालिका सध्या त्यांच्याकडे नोंद असलेल्या शहरातील प्रत्येक घराकडून वार्षिक २४० रुपये घनकचरा व सार्वजनिक स्वच्छता खर्च घेते.

या पैशांची वसुली संबंधित कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराने करण्याची अट महापालिकेची होती. पण मनपाची घनकचरा संकलनाची वार्षिक वसुलीची रक्कम साडेपाच कोटीची असली तरी प्रत्यक्षात वसुली अवघी ३ कोटींची होते व शहरभरातील कचरा संकलनाचा खर्च सुमारे ६ कोटीचा होतो. त्यामुळे हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यास कोणीही ठेकेदार तयार नाही. परिणामी, आता ठेकेदाराने वसुली करण्याची अट दूर करून फक्त महापालिकेने घेतलेली वाहने भाडे तत्त्वावर वापरण्याचे बंधन घालण्याचे ठरवण्यात आले आहे. तशी निविदा आता प्रसिद्ध होणार असून, तिला प्रतिसाद मिळाला नाही तर उपलब्ध नव्या वाहनांद्वारे मनपाच स्वतः कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणार आहे.

मनपाने नव्या ३० घंटागाड्या, चार प्रभागांसाठी चार कॉम्पेक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रॅक्टर इंजिन, सेप्टिक टँक-ट्रॉली, फिरते शौचालय, १५० कचरा कंटेनर अशी अनेकविध वाहने व साहित्यांसह जेसीबी मशीन, पोकलॅन मशीन, वजन काटे असेही अन्य काही साहित्य घेण्याचे ठरवले आहे. मंगळवारी (२० डिसेंबर) सकाळी ११ वाजता महापौर सुरेखा कदम यांच्या उपस्थितीत घनकचरा संकलन व सुविधांबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर महासभेतही या विषयावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *