facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / नव्या वर्षात संपाचा इशारा

नव्या वर्षात संपाचा इशारा

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नव्या वर्षात, म्हणजे १८ ते २० जानेवारी २०१७ असे सलग तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिला आहे. या संपात राज्यातील १९ लाखांवर सरकारी व निमसरकारी कर्मचारी व शिक्षक सहभागी होणार असल्याचा दावा मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी केला आहे.

नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून निश्चित लाभाची जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सातव्या वेतन आयोगातील कर्मचारीविरोधी शिफारशी रद्द कराव्यात व या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जावी, नोकरभरतीवरील निर्बंध हटवून ४० टक्के रिक्त पदे तातडीने भरली जावीत व निवृत्तीचे वय ६० वर्षे केले जावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप केला जाणार आहे.

या मागण्यांसह पाच दिवसांचा आठवडा करावा, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शासन केले जावे, तसेच सरकारी सेवांतील कंत्राटीकरण व नैमित्तिक नियुक्ती पद्धत रद्द करून अस्थायी पदावरील कर्मचाऱ्यांना स्थायी केले जावे, या मागण्याही संघटनेने मांडल्या आहेत.

मागील दोन वर्षांत निदर्शने, लक्षवेधी दिन, दोन तास जादा काम आंदोलन, आझाद मैदानावर मोर्चा, तसेच एक दिवसांचे दोन संप करूनही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली नसल्याचे मध्यवर्ती संघटनेचे म्हणणे आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत ठोस धोरण जाहीर केले गेलेले नाही, दोन वर्षांपूर्वी संघटनेच्या नेत्यांशी दीड तास चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, पण ते त्यांच्या शब्दाला जागले नाहीत व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी कोठलाही निर्णय घेतला नाही, असा दावाही संघटनेने केला आहे. त्यामुळेच नव्या वर्षात तीन दिवस संप करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *