facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / उसाप्रमाणेच दुधालाही हमीभाव द्यावा : पिचड

उसाप्रमाणेच दुधालाही हमीभाव द्यावा : पिचड

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – उसाप्रमाणे शेतकऱ्यांच्या दुधालाही हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी आमदार वैभव पिचड यांनी केली. शेतकऱ्यांनीही बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

तालुक्यातील राजूर येथील देशी-विदेशी डांगी जनावरांच्या प्रदर्शनात निवड झालेल्या जनावरांच्या मालकांचा सत्कार आमदार पिचड यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. आदिवासी सेवक मीनानाथ पांडे, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, अरुण शेळके, जयंत आढाव, गोरक्ष माळुंजकर, सरपंच हेमलता पिचड, गटविकास अधिकारी पाटील, तालुका कृषी अधिकारी माधव हासे आदी या वेळी उपस्थित होते.

वैभव पिचड म्हणाले, तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेवटच्या टप्प्यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले, तरी प्रशासनाने आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी लावण्याऐवजी जास्त लावल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला. आणेवारी कमी लावावी. दुधाला भाव नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यात नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे असतानाही प्रदर्शनात डांगी जनावरे आणून शेतकऱ्यांनी डांगी जनावरांच्या प्रदर्शनाची परंपरा जपली आहे. पुढील वर्षी या प्रदर्शनाची बक्षिसे वाढवून दिली जातील, असेही ते म्हणाले.

डांगी व सुधारित जनावरांच्या प्रदर्शनात डांगी वळूंची जिल्हा पशुवैद्यकीय उपायुक्त डॉ. एल. बी. भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर व नाशिक जिल्ह्यांतील आठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समितीकडून निवड करण्यात आली. या निवडीच्या रिंगणात संगमनेर येथील रफिकभाई यांच्या दहा अश्वांनी केलेले अश्वनृत्य खास आकर्षण ठरले. ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद तसेच अहमदनगर या जिल्ह्यांतील वळू मालकांनी या प्रदर्शनात खरेदी-विक्रीबरोबर या निवडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अकोले तालुक्यातील कोकणेवाडी येथील चंद्रकांत सखाराम बेंडकोळी यांचा वळू चॅम्पियन ठरला. त्यास पंधरा हजार रुपयांचे तर उप चॅम्पियन ठरलेल्या वळूचे मालक समशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांना सात हजार रुपयांचे पारितोषिक व शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन आमदार पिचड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी प्रास्ताविक केले. संतोष बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. माधव गभाले यांनी आभार मानले.

नोटाबंदीचा परिणाम नाही

राजूर येथील प्रदर्शनावर नोटाबंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही; मात्र, केवळ हवाल्यावर व चेकवर व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये व्यवहार झाल्याचे पाहायला मिळाले. छोटे-मोठे दुकानदार दोन हजारांची नोट घेऊन किमान ५०० रुपयांचा माल खरेदी करणाऱ्यांना सुट्टे पैसे देताना आढळले. मागील वर्षीपेक्षा या वर्षी कमी गर्दी पहायला मिळाली. रहाट पाळणे व इतर व्यवसायिकांनीही बऱ्यापैकी व्यवसाय झाल्याचे सांगितले. तमाशा कलावंतांनी या वर्षी प्रदर्शनाकडे पाठ फिरवल्याने डांग भागातील शेतकरी नाराज झाले. त्यामुळे चार दिवस चालणारे प्रदर्शन तिसऱ्या दिवशी आवरले. प्रचंड गर्दीमुळे सोमवारी वाहतूकही तीन तास विस्कळित झाली होती. आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला उपस्थित होते.

चौकट ः

विविध प्रकारांतील विजेते

आदत प्रकार – भाऊसाहेब वावळे (मेहंदुरी). दोन दाती – गोपाला पंजा सदगीर (समशेरपूर). चार दाती – चंद्रकांत बेंडकोळी (कोकणेवाडी). सहा दाती – गणपत पिचड (पिंपरकणे). आठ दाती – मधुकर ढोन्नर (समशेरपूर). तसेच उत्कृष्ट बैलजोडीमध्ये ज्ञानदेव उगले (पाडाळणे). दुभती गाय – दादापाटील गोडसे (मोग्रस). प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक – चार हजार, द्वितीय क्रमांक – तीन हजार तर तृतीय क्रमांक – एक हजार या प्रमाणे रोख बक्षिसे देण्यात आली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *