facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नाशिक / त्या नोटांचा तपास इन्कम टॅक्सकडे

त्या नोटांचा तपास इन्कम टॅक्सकडे

२० ते २५ टक्के कमिशन घेऊन चलनातून बंद झालेल्या नोटा बदलून देणाऱ्या चार जणांचा तपशील पोलिसांनी इन्कम टॅक्स (आयटी) विभागाला दिला आहे. संशयितांकडे हे पैसे कसे आणि कुठून आले, याचा तपास आता आयटी विभागच करणार आहे.

शहर पोलिसांनी रविवारी दिवसभरात दोन ठिकाणी सापळे रचून चार संशयितांना अटक केली होती. पोलिसांनी या चौघांकडून १,५०० नोटा (एकूण ३० लाख रुपये) जप्त केल्या. २० ते २५ टक्के कमिशन घेऊन हे संशयित जुन्या नोटा बदलून देण्याचा उद्योग करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचच्या युनिट एकने ही कारवाई केली होती. यातील असद जाकीर सय्यद या ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाला वडाळागाव येथील मुस्तफानगरातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याकडून १७ लाख रुपये जप्त केले. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन परिसरात सापळा रचून पोलिसांनी रोशन घनश्याम वालेचा (वय २६, लक्ष्मणरेखा अपार्टमेंट, सेवाकुंज, पंचवटी), गोरख महादू गोफणे (४६, डाऊच खुर्द, कोपरगाव, अहमदनगर) आणि सयाजद अब्दुलरहेमान मोटवाणी (३५, मदिना लॉन्सजवळ, वडाळा रोड, नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या तिघांकडून नवीन दोन हजार रुपयांच्या ६५० नोटा (१३ लाख रुपये) जप्त केल्या. या प्रकरणी संशयितांविरुद्ध सीआरपीसी १०२ प्रमाणे कारवाई करीत त्यांना कोर्टात हजर केले.

युनिट एकचे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी सांगितले, की संशयितांना कोर्टात हजर केले असता त्यांनी ही रक्कम आपलीच असून, पोलिसांनी जप्त केली असल्याचे सांगितले. कबुलीजबाब झाल्यानंतर कोर्टाने पुढील कार्यवाहीचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार आयटी विभागाला सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. आयटी विभाग संशयितांची चौकशी करेल. त्यात संशयितांनी ही रक्कम वैध असल्याचे सिद्ध केल्यास त्यांना कोर्टाच्या आदेशाने पैसे परत करण्यात येतील. मात्र, त्यांनी या पैशांचा स्रोत सिद्ध केला नाही तर आयटी विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेले पैसे इंदिरानगर आणि सरकारवाडा पोलिसांच्या कस्टडीत पाठवण्यात आले आहेत.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *