facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / मुंबई / ‘नो कट प्रॅक्टिस’ला मुंबईचा खो

‘नो कट प्रॅक्टिस’ला मुंबईचा खो

केरळ, पुद्दुचेरीसह इंदूर तसेच नाशिकमधील रेडिओलॉजिस्टनी डॉक्टरांना कट देण्याची कुप्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईत अजून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. डॉक्टरांना कोणत्याही स्वरुपाच्या भेटवस्तू, सहली, पार्ट्या, कमिशन देऊ नये, अशा सूचना ‘इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन’ या शिखर संघटनेने देशभरातील रेडिओलॉजिस्टना दिल्या आहेत. नाशिकच्या रेडिओलॉजिस्टनी कट देणे बंद केले असून त्यामुळे सोनोग्राफीपासून एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय आदी चाचण्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झाल्याचा दावा डॉक्टर करतात.

देशभरातील सोनोग्राफी सेंटर, एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय सेंटर्स चालवणाऱ्या डॉक्टरांची नवी दिल्लीत ‘इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन’ ही शिखर संघटना आहे. चाचण्यांसाठी रुग्ण पाठवणाऱ्या जनरल प्रॅक्ट‌िशनर्सना कोणत्याही प्रकारचे कमिशन, भेटवस्तू देणे बंद करा, अशा सूचना या संघटनेने देशातील सर्व रेडिओलॉजिस्टना दिल्या आहेत. इंदूर शहरासह पुद्दुचेरी, केरळ अशा काही राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच्या पावलावर पाऊल टाकत नाशिक रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनने शिखर संघटनेच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआरआय चाचणीचे शुल्क सहा हजारांवरून पाच हजार रु., सोनोग्राफी आठशेवरून सातशे, मेंदूच्या सिटीस्कॅनसाठी अडीच हजारांऐवजी दोन हजार रु. एवढे कमी झाले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार असला, तरी मात्र रेडिओलॉ​जिस्टच्या या निर्णयामुळे नाशिकमधील डॉक्टरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरांनी दबावतंत्र वापरत सोनोग्राफी, एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय चाचणीसाठी रुग्णांना खासगी सेंटर्सकडे न पाठवता सरकारी रुग्णालये, चॅरिटेबल ट्रस्ट व कॉर्पोरेट रुग्णालयात पाठवण्यास सुरुवात केल्याचे समजते.

मुंबईत मात्र या निर्णयाची अजून अंमलबजावणी झालेली नाही. यापूर्वी धुळे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर व नवी मुंबईतही याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी रेडिओलॉजिस्टची एकी नसल्याने या धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगण्यात येते.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कर्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून इतर वैद्यकीय शाखेच्या संघटनांनीही रेडिओलॉजिस्टप्रमाणे ही प्रथा बंद करावी, असे आवाहन केले आहे. राज्यातील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे सेक्रेटरी डॉ. संजीव मणी यांनी मात्र या विषयावर तूर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

आमच्या शिखर संघटनेने केलेल्या सूचनांची आम्ही फक्त अंमलबजावणी करीत आहोत. केवळ नाशिक नव्हे, तर धुळे, जळगाव आदी ठिकाणच्या रेडिओलॉजिस्टनीही कट प्रॅक्टिस नको या धोरणाची सुरुवात केली आहे.

– डॉ. सुशांत बदाने, सेक्रेटरी, नाशिक रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन

नैतिकतेने वैद्यकीय व्यवसाय करा, कट प्रॅक्टिस, कमिशनवर विश्वास ठेवू नका, असे पत्र आम्ही सदस्यांना दर महिन्याला पाठवत आहोत. सहा ते आठ जानेवारीला जयपूरमध्ये होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.

– डॉ. ओमप्रकास बन्सल, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *