facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / पुणे / पवारांना निमंत्रणाबाबत बापटांचे तळ्यातमळ्यात

पवारांना निमंत्रणाबाबत बापटांचे तळ्यातमळ्यात

महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी सांगितले. मोदी यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (२४ डिसेंबरला) पुणे मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे.
‘शहरात मेट्रो प्रकल्प आणण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, केंद्रात आणि राज्यात सरकार असल्याने आम्हीच तो मार्गी लावला, असा डांगोरा पिटून राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पंतप्रधानांच्या राजशिष्टाचाराचे कारण पुढे करून भाजपच्या नेत्यांसाठी आणि अन्य पक्षीयांसाठी स्वतंत्र दोन व्यासपीठे उभारण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही भाजपने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेचा वापर करून भाजप चुकीचा पायंडा पाडत आहे. शहराच्या विकासात कोणतेही राजकारण आणणार नाही, ही आमची भूमिका असल्याने सर्व पक्षांना एकत्र घेऊनच मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल,’ असेही महापौर म्हणाले.
मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यामुळे शनिवारच्या कार्यक्रमाला महापौर म्हणून मी हजर राहणार नाही. एकाच प्रकल्पाचे दोनवेळा भूमिपूजन करण्याचे आपल्याकडे प्रथा नाही. त्यामुळे मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यास त्यावर पालिका बहिष्कार टाकेल, असेही जगताप म्हणाले.

पवारांना निमंत्रणाबाबत बापटांचे तळ्यातमळ्यात

‘पुणेकरांनी अनेक वर्षे प्रतीक्षा केलेल्या मेट्रोचे भूमिपूजन येत्या शनिवारी (२४ डिसेंबर) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, सर्व पक्षांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात येईल,’ असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित करण्याचा आग्रह राष्ट्रवादीतर्फे धरला जात असला, तरी त्याविषयी कोणतेही भाष्य न करता सर्वांना सोबत घेऊ एवढीच पुस्ती बापट यांनी जोडली.
पुणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर मुख्य व्यासपीठावर असले तरी, राजशिष्टाचारामुळे सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल, असे सूतोवाच बापट यांनी पत्रकार परिषदेत केले. मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले. ‘पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांनुसार काही गोष्टींचे भान राखावे लागते. त्यामुळे, मुख्य व्यासपाठीवर मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती असेल. त्यात, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांना स्थान देण्यात आले आहे,’ असे बापट यांनी नमूद केले.
शरद पवार यांनी मेट्रोसाठी पाठपुरावा केला असल्याने त्यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले जावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे, त्यांनाही व्यासपीठावर बोलावणार का, याबाबत वारंवार विचारणा करूनही बापट यांनी थेट उत्तर देणे टाळले. मेट्रोसाठी सर्वांचे सहकार्य घेऊनच पुढे जाणार, याचाच पुनरूच्चार त्यांनी केला. मेट्रोचे भूमिपूजन हा पुणेकरांसाठी सर्वांत आनंदाचा क्षण असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पवारांची उपस्थिती; महापौरांचे घूमजाव

मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नेमके कोणाच्या हस्ते करायचे यावरून सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (२४ डिसेंबर) होणाऱ्या कार्यक्रमात शरद पवार यांचा सहभाग निश्चित मानला जात आहे. भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे; तसेच मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पवार यांना व्यासपीठावर बसण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती मंगळवारी रात्री उशिरा विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शरद पवार यांचे नाव आणि त्यांना स्थान देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही आडकाठी आणली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, बुधवारपर्यंत वाट पाहण्याचे जाहीर केल्यानंतरही महापौरांनी पुन्हा भूमिका बदलून स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा घाट घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *