facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / पाणीपुरवठा विभाग टार्गेट

पाणीपुरवठा विभाग टार्गेट

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – नळजोडणीच्या खोदाईत वरकमाई, केमिकल खरेदी, विनामीटर पाणी, बेकायदेशीर पाणी कनेक्शन अशा प्रकारांनी पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. सामान्यांची लूट व श्रीमंतांची सोय केली जात असल्याचा घणाघाती आरोप करत नगरसेवक सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनावर अक्षरश: तुटून पडले. सामान्य माणसांना नळ जोडणीसाठी हेलपाटे मारून खोदाईच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असून अपार्टमेंटचे कनेक्शन तातडीने दिले जात असल्याचे व बेकायदेशीर पाणी कनेक्शनही तातडीने देण्याचे प्रकार होत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागात सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरजही नगरसेवकांनी व्यक्त केली.

महापौर हसीना फरास यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी प्रथमच सर्वसाधारण सभा झाली. आयुक्त व नगरसेवकांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फरास यांनी बैठक घेऊन आयुक्त व नगरसेवकांमध्ये समेट घडवून आणला होता. या समेटाचा परिणाम मंगळवारी झालेल्या सभेमध्ये दिसून आला. एकमेकांवर ​चिखलफेक करून सभेमध्ये गोंधळ करण्याच्या प्रकाराऐवजी काम चांगले करण्यासाठी व प्रशासनाला कामकाजात सुधारणा करता यावी यादृष्टीने चर्चा झाली. सभा सुरू होण्यापूर्वी सभेची वेळ झाली आहे, कोरमही झाला असून मिटींग फॉर चेअरमन करावा, अशी मागणीचे पत्र भाजप, ताराराणी आघाडीने आयुक्तांना दिले. त्यावेळी महापौर फरास सभागृहात आल्यानंतर हा विषय संपुष्टात आला.

विषय​पत्रिकेत पाणीपुरवठा विभागाला गळती काढण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करण्याच्या विषयापासून पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. जादा निधी घेतला जात असताना ज्या भागात गळती आहे, त्या दुरुस्त होण्याची गरज मांडली. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाकडून भागातील अत्यावश्यक गळती दुरुस्त करण्याचे प्रस्ताव घ्यावेत, अशी मागणी शारंगधर देशमुख, सत्यज‌ित कदम, शोभा कवाळे, अनुराधा खेडकर यांनी केली. महापौर फरास यांनीही पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून आवश्यक त्या गळती दुरुस्त करण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी मात्र राजसिंह शेळके यांनी पाणीपुरवठ्याचा भोंगळ कारभार उघड केला. ते म्हणाले, आयुक्त पैशांची काटकसर करत असताना दुसरीकडे त्यांचे काही कर्मचारी महापालिकेच्या तिजोरीत येणारी रक्कम कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्यांना नवीन कनेक्शन लवकर मिळत नाही. त्यासाठीही कर्मचारी मनमानी पद्धतीने खोदाईचा दर आकारत आहेत. अपार्टमेंटला त्वरित कनेक्शन मिळते. यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. सत्यजित कदम यांनीही अर्धा इंच कनेक्शनचा खोदाईचा दर ठरवण्याची आवश्यकता आहे. मीटर रिडर व अधिकाऱ्यांची मिलीभगत असून या विभागावरील अंकुशच राहिलेला नसल्याचे सांगितले.

‘सर्जिकल स्ट्राइक करा’

भूपाल शेटे यांनी तर या विभागाची विविध प्रकारची टेंडर कुणाला द्यायची हे एक दहावी पास कर्मचारी ठरवत आहे. शहरातील वीज कनेक्शनच्या तुलनेत पाणी कनेक्शन कमी आहेत, येथेच मोठा घोळ आहे. अनेकांना बेकायदेशीरपणे पाणी कनेक्शन दिले जात असून आयुक्तांनी सर्जिकल स्ट्राइक करण्याची आवश्यकता व्यक्त केली. रुपाराणी निकम यांनीही काही भागात तीन हजारावर बोगस नळ कनेक्शन असल्याचा आरोप केला. मेहजबीन सुभेदार यांनी प्रशासनाधिकाऱ्यांचे महापालिकेच्या शाळांकडे लक्ष नाही. अनेक ठिकाणी बेंचची आवश्यकता आहे. अनेक शाळांची दुरुस्ती केली पाहिजे. पण अधिकारी भेटच देत नसल्याने ही परिस्थिती समजत नाही. सभेमध्येही अधिकारी येत नाहीत, असे मांडले. त्यावर महापौर फरास यांनी पुढील सभेला प्रशासनाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आदेश दिले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *