facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / पुणे विभागात ३० कोटी जप्त

पुणे विभागात ३० कोटी जप्त

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने पुणे विभागाअंतर्गत राबवलेल्या ५७ शोधमोहिमा व छाप्यांमधून आतापर्यंत १२.३२ कोटी रुपयांच्या नव्या चलनासह ३० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत १०० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती समोर आली आहे. मुंबई वगळता राज्यात पाच हजारांहून अधिक खातेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सुमारे, बारहाशे जन-धन खात्यांवरही प्राप्तिकर विभागाची बारीक नजर आहे.

‘आठ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर पुण्यातील प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण (इन्व्हेस्टिगेशन) विभागाने ५७ शोधमोहिमांतर्गत छापे टाकले आहेत. यामध्ये ३० कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६.३२ कोटी रुपये जप्त झाले असून, त्यात नवे चलन फक्त २४ लाख रुपयांचेच आहे. यापैकी ज्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आढळून आले आहे, अशी चार प्रकरणे केंद्रीय अन्वेषण विभाग व अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सोपवण्यात आली आहेत,’ अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या पुणे विभागाच्या अन्वेषण विभागाचे अतिरिक्त संचालक करुण ओझा यांनी पत्रकाद्वारे दिली.

‘नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष आहे. मुंबई वगळता राज्यातील ज्या खात्यांमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली, अशा पाच हजारांहून अधिक खातेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. तसेच जन-धन खात्यांमध्ये पैसे भरण्यावर निर्बंध येण्यापूर्वी ज्या खात्यांमध्ये ५० हजारांहून अधिक रक्कम जमा झाली, अशा बाराशेहून अधिक खात्यांवरही प्राप्तिकर विभागाची नजर आहे,’ असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

‘प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीनंतर व अघोषित उत्पन्न जाहीर करण्याची योजना संपल्यानंतर केलेल्या कारवाईदरम्यान आतापर्यंत १०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघड झाली आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असेही सूत्रांनी सांगितले.

दूरध्वनीवरून मिळाली माहिती

प्राप्तिकर विभागाच्या हेल्पलाइनवर आतापर्यंत पुणे विभागातून १५० दूरध्वनी आले आहेत. यापैकी सात दूरध्वनींद्वारे मिळालेल्या माहितीआधारे केलेल्या कारवाईत अघोषित मालमत्ता किंवा रोकड आढळली आहे. काही दूरध्वनी करणाऱ्यांनी अगदी त्रोटक किंवा अपुरी माहिती दिली. काहींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दूरध्वनी करणाऱ्यांनी पुरेसा तपशील दिल्यास कारवाई करणे सोपे जाते, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *