facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / पुणे / रंगला जावडेकर सरांचा तास

रंगला जावडेकर सरांचा तास

‘मी ज्योतिषी नाही; पण भविष्य सांगणार आहे…नजीकच्या काळात आधार कार्डवर आधारित मोबाइल व्यवहारांचीच चलती राहील. देशात घडणाऱ्या डिजिटल क्रांतीचे सैनिक बनण्याची संधी विद्यार्थ्यांना आयती चालून आली आहे. ​किमान लाखभर लोकसंख्या असलेल्या ५०० शहरांमध्ये डिजिटल क्रांती घडणार आहे. त्या क्रांतीचे साक्षीदार बना,’ असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
सर परशुरामभाऊ कॉलेजच्या खो-खो मैदानावर जावडेकर सरांचा मंगळवारी सायंकाळी क्लास रंगला होता. शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थांच्या दहा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ‘कॅशलेस व्यवहार’ या विषयावरील व्याख्यानासाठी गर्दी केली होती. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, अॅड. एस. के. जैन, राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. शरद कुंटे, मेघा पंडित आदी याप्रसंगी उपस्थित होते. चाळीस मिनिटांमध्ये जावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना ‘डिजिटल क्रांती’चे सैनिक बनण्याचे आवाहन केले. तसेच, या क्रांतीमध्ये सहभागी होणाऱ्यांना आपल्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, बँकेतील अधिकाऱ्यांनी पॉइंट ऑफ सेल अर्थात ‘पॉस’, आधार कार्डवर आधारीत मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल व्यवहार कसे करावे, याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवले.
‘स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी तसेच अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी आंदोलने केली. आणीबाणीमध्ये कॉलेजच्या मैदानांत आम्ही सत्याग्रह केले; पुढे तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी डिजिटल क्रांती ही एक संधी आहे. त्याचे सैनिक बना, सेनानी बना,’ असे आवाहन जावडेकर यांनी केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *