facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / अहमदनगर / आरोपी शिंदेचा पाठलाग केला

आरोपी शिंदेचा पाठलाग केला

‘तुकाई लवणवस्ती येथून कोपर्डी गावात चारीच्या रस्त्याने जात असताना मुलीची सायकल रस्त्याच्या कडेच्या शेतात पडलेली दिसली. मुलीच्या नावाने आवाज दिल्यानंतर तिचा प्रतिसाद आला नाही. परंतु, त्या वेळी गावातील जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याला लिंबाच्या झाडापासून पळताना पाहिले. त्या ठिकाणी गेलो असता मुलगी विवस्त्र स्थितीत दिसून आल्याने पप्पूचा त्याच्या घरापर्यंत पाठलाग केला होता’, अशी साक्ष कोपर्डीतील अत्याचार प्रकरणी फिर्याद देणाऱ्या व प्रत्यक्ष साक्षीदाराने बुधवारी न्यायालयात नोंदविली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात या खटल्याची नियमित सुनावणी सुरू झाली आहे. बुधवारी मृत मुलीचा चुलतभाऊ व या खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार याची साक्ष नोंदविण्यास विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी सुरुवात केली. या साक्षीदाराची साक्ष तब्बल चार तास नोंदविण्यात आली. आरोपी पप्पूला साक्षीदाराने ओळखले. या साक्षीदाराची साक्ष अपूर्ण राहिली असून, उर्वरित साक्ष गुरुवारी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपीच्या वकिलांकडून या साक्षीदाराची उलटतपासणी होईल. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे न्यायालयात हजर होते.

‘१३ जुलैच्या रात्री सात वाजण्याच्या सुमारास दोन मित्र व मी तुकाई लवणवस्ती येथून कोपर्डी गावात मोटारसायकलवरून चारीच्या रस्त्याने जात होतो. त्या वेळी माझी काकू व चुलत बहीण मुलीला शोधण्यासाठी निघाले होते. ‘मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली आहे. खूप वेळ झाला अजून आलेली नाही, आजोबाच्या घरी पाहून तिला पाठवून दे’ असा निरोप काकूने मला दिला होता. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेच्या शेतात सायकल पडलेली दिसली. सायकलच्या लावलेल्या कॅरिबॅगमध्ये मसालाच्या पुड्या होत्या. मी मुलीच्या नावाने हाक मारली. परंतु, तिचा प्रतिसाद आला नाही. त्याच वेळी लिंबाच्या झाडाजवळ आरोपी पप्पू शिंदे उभा दिसला. येथे काय करतोस, असे म्हणाल्यानंतर तो गावाच्या दिशेने पळून लागला. मी लिंबाच्या झाडाजवळ गेलो. माझे दोन मित्रही माझ्यामागे आले. लिंबाच्या झाडाजवळ मुलगी रक्तबंबाळ व विवस्त्र स्थितीत पडलेली होती. मुलीची आई व बहीण तेथे आल्याने त्यांना तेथे थांबून मी व मित्राने आरोपी पप्पू उर्फ जीतेंद्र याचा पाठलाग सुरू केला. एका शेतातून पाठलाग करत त्याच्या घरी गेले. स्वतःच्या आईला धक्का देऊन पप्पू पळून गेला. पप्पूच्या मागे का पळता, अशी विचारणा त्याच्या आईने माझ्याकडे केली. मी घडलेली घटना पप्पूच्या आईला सांगितली. पुन्हा पायवाटेने मुलीकडे येत असताना रस्त्यात मोटारसायकल व आरोपीची चप्पल पडलेली दिसली’, अशी साक्ष फिर्यादीने नोंदविली आहे. ‘मुलीचे ओठ रक्तबंबाळ झालेले होते. तिच्या अंगावर चावे घेतलेले होते. मुलीला कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला’, असे फिर्यादीने न्यायालयात सांगितले. मृत मुलीचे अंगावरील कपडे व इतर वस्तू, आरोपीची चप्पल इतर वस्तू न्यायालयात साक्षीदाराने ओळखल्या आहेत.

न्यायालयावर आरोप करणारा अर्ज मागे

कोपर्डीच्या सुनावणीत आरोपी नितीन भैलुमेचे वकील अॅड. प्रकाश आहेर अर्जावर अर्ज करत आहेत. बुधवारच्या सुनावणीच्या वेळी आहेर यांनी एक अर्ज दाखल करत न्यायाधीशांवर आरोप केला. ‘या न्यायालयाने आरोपीची बाजू मांडताना संधी दिलेली नाही. सर्व अर्ज फेटाळून लावले असल्याने, न्यायाधीशांवर विश्वास नाही. त्यामुळे हा खटला या न्यायालयासमोर चालविण्याची इच्छा नाही’, असा युक्तिवाद अॅड. आहेर यांनी केला. तो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खोडून काढला. ‘आरोपीचे वकील न्यायाधीशांवर अशा प्रकारे दबाव आणू शकत नाहीत. इतर दोन आरोपींच्या वकिलांनी न्यायालयावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे आहेर यांनी हा अर्ज काढून घेतला पाहिजे’, असा युक्तिवाद निकम यांनी केला. त्यानंतर आरोपीचे वकील आहेर यांनी न्यायालयावर आरोप करणारा अर्ज काढून घेतला.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *