facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / पुणे / ‘एचए’च्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

‘एचए’च्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

आर्थिक डबघाईला आलेल्या ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’च्या (एचए) पुनर्वसनासाठी त्यांच्याकडील अतिरिक्त असलेल्या सुमारे ८७ एकर जागेची विक्री करून, त्यातील रकमेतून कामगारांचे थकीत वेतन आणि अन्य खर्चांसाठी शंभर कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

एचए कंपनीकडील ८७.७० एकरचा अतिरिक्त आणि मोकळा भूखंड विकून कंपनीवर असलेले ८२१.१७ कोटी रुपयांचे देणे फेडण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आला. कामगारांचे वेतन, बँकांची कर्जे, तसेच अन्य देणी मिळून हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला ८२१ कोटी रुपयांची देणी फेडायची आहेत. १८६.९६ कोटी रुपयांचे मुद्दल आणि त्यावरील १२०.२७ कोटी रुपयांचे व्याज असे केंद्र सरकारचे ३०७.२३ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. शिवाय १२८.६८ कोटी रुपयांच्या विविध देण्यांची परतफेड लांबणीवर टाकण्यात आली आहे.

‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’च्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि महत्त्वाच्या खर्चांसाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचे कर्ज तात्काळ मंजूर केले असून, त्याची परतफेड भूखंडविक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून करण्यात येईल. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे केंद्राला ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’च्या मालमत्तेचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळणार असून, कंपनीचे पुनर्वसन, धोरणात्मक विक्री किंवा कंपनी बंद करण्याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची मुहूर्तमेढ रोवणारी एचए कंपनी गेल्या काही वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे. त्यामुळे गेल्या २५ महिन्यांपासून तेथील सुमारे अकराशे कामगारांना वेतन मिळालेले नाही. ते मिळावे आणि कंपनीचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न चालू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला होता. व्यावसायिक वित्तीय सल्लागार आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स’चा कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव या अभ्यासगटाने तयार केल्याचे समजते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या समितीने जमीनविक्रीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याची शिफारस केली. त्यावर शिक्कामोर्तब होऊन कंपनीच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग खुला झाला आहे.

………

८७ एकर जागा अतिरिक्त

पिंपरीत एचए कंपनीचे सुमारे २७० एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ८७ एकर जागा अतिरिक्त आहे. ‘ही जागा सरकारी उपक्रमांना विकून निधी उभारण्यात येईल. त्यातून कामगारांचे वेतन आणि कंपनीच्या इतर महत्त्वाच्या खर्चांसाठी शंभर कोटी रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम अन्य स्वरूपातील देणी आणि कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी वापरण्यात येईल,’ अशी माहिती एचए मजदूर संघटनेचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *