facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नाशिक / चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला

चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला

मराठीत एक म्हण आहे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असाच काहीसा अनुभव नांदगाव तालुक्यातील सचिन खैरनार यांना आला. आपल्याला आलेले कुरिअर घेण्यासाठी ते न्यायडोंगरी येथून मालेगाव येथे तब्बल दोनशे रुपये खर्चून गेले खरे, पण मिळालेल्या पाकिटात होता अवघ्या ३२ पैशांचा व्होडाफोन कंपनीने पाठवलेला धनादेश. आता हा धनादेश घेऊन हसावं की रडावं हेच सचिन खैरनार यांना उमगत नाहीये. हा ३२ पैशांचा धनादेश मात्र सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

एखाद्या मोबाइल कंपनीचा प्रामाणिकपणासुद्धा कोणाची डोकेदुखी ठरू शकते याचा भन्नाट अनुभव सचिन खैरनार यांना आला आहे. अवघ्या ३२ पैशांचा धनादेश हातात पडल्यावर सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांच्या मनाची स्थिती झाली आहे. हा ३२ पैशांचा धनादेश सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. मालेगाव येथे कंपनीत कामास असलेले व न्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथे राहत असलेले सचिन खैरनार यांच्याकडे व्होडाफोन कंपनीचे पोस्टपेड सिमकार्ड होते. ते कार्ड त्यांनी पोर्टबेल करून आयडियाचे सिमकार्ड घेतले. नंतर व्होडाफोन कंपनीने प्रामाणिकपणाने सचिन यांची जास्त भरली गेलेली अवघ्या ३२ पैशांची रक्कम त्यांना अॅक्सिस बँकेच्या चेकद्वारे कुरिअरने त्यांच्या पत्त्यावर पाठवली. पण पत्ता अपुरा असल्याने ते पाकीट मालेगाव कार्यालयात परत गेले.

न्यायडोंगरी येथे असलेल्या खैरनार यांना मालेगाव येथून कुरिअर घेऊन जाण्यास सांगितले आता कसले कुरिअर? याबाबत सचिन खैरनार पूर्णतः अनभिज्ञ होते. पण महत्त्वाचे काही असेल म्हणून तब्बल दोनशे रुपये खर्च करून ते मालेगावला गेले आणि हातात पडलेल्या पाकिटात असलेला त्यांच्या नावाचा ३२ पैशांचा धनादेश पाहून ते अचंबित झाले. त्यासाठी २०० रुपये खर्चावे लागले.

हसावं की रडावं

आता ३२ पैशांचा चेक घेऊन कंपनीच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करावे, की चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला हा अनुभव आला म्हणून कपाळावर हात मारून घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडलाय. या गोष्टीमुळे हसावं की रडावं हेच त्यांना कळेनासे झाले आहे. मात्र ३२ पैशांच्या चेकची ही गोष्ट नोटाबंदीच्या तणावात मिस्किलता पेरणारी ठरली आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *