facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नाशिक / जिल्हाधिकाऱ्यांच्याच दालनात धूर निघतो तेव्हा…

जिल्हाधिकाऱ्यांच्याच दालनात धूर निघतो तेव्हा…

जिल्ह्यात कुठेही आपत्ती उद्‍भवली की तत्काळ मदत मिळेल, या विश्वासाने संकटग्रस्त नागरिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधतात. परंतु, हीच आपत्ती या विभागाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओढावते तेव्हा प्रशासकीय यंत्रणेची कशी धांदल उडते याचा प्रत्यय बुधवारी आला. आगीवर मात करणारे फायर एक्स्ंटिग्युशर चालविण्याचे शास्त्रशुध्द ज्ञानच यंत्रणेला नसल्याचे उघड झाले. यानिमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाच्या सज्जतेचा बुरखाही फाडला गेला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दगडी इमारतीमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांचे प्रशस्त दालन आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा नेहमीच राबता असतो. राज्य सरकारच्या वतीने पुढील आठवड्यात नाशिकमध्ये महाआरोग्य शिबिर होणार असल्याने त्याबाबतची बैठक बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली होती. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक आटोपून जिल्हाधिकारी त्यांच्या दालनात येणार त्याचवेळी या दालनात धूर निघत असल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. एकाएकी निघू लागलेल्या या धुरामुळे अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. धूर नेमका कोठून निघतोय याची पाहणी कर्मचारी करू लागले. धूर निघणे सुरूच असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी दालनाबाहेरील फायर एक्स्ंटिग्युशर मशिन घेऊन कर्मचाऱ्यांनी दालनाकडे धाव घेतली. परंतु, त्याचा वापर कसा करावा हे कुणालाच माहीत नव्हते. येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारीही दालनात आले. मात्र त्यांनाही मशिन कसे हाताळावे याची माहिती नव्हती. त्यामुळे आग विझविण्याचे मशिन हातात असूनही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याचवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या दालनात आले. फायर एक्स्ंटिग्युशर मशिन कसे वापरतात याची माहिती त्यांनी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात या मशिनचा वापर करण्यात आला. दालनाचे दोन्ही दरवाजे उघडून देण्यात आले. हाकेच्या अंतरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालय असूनही या घटनेपासून ते अनभिज्ञ होते.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *