facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / पुणे / पालिकेकडून नववर्षाची भेट

पालिकेकडून नववर्षाची भेट

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी बस खरेदीपासून ते बसचे पार्किंग तसेच बसच्या देखभालीसाठी डेपोंची संख्या वाढविण्याचा निर्णय आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच्या अखेरच्या महिन्यात सर्वसाधारण सभेने बुधवारी घेतला. तसेच, नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी दर महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहरभर पीएमपीने मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेऊन नववर्षाची निवडणूकपूर्व भेट देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

पंधराशे बसचा मार्ग मोकळा

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या पंधराशे बस घेण्यासाठीच्या आर्थिक व्यवस्थेला बुधवारी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यानुसार, मासिक हप्ते पद्धतीने घेण्यात येणाऱ्या नऊशे बसच्या खरेदीसाठी पुढील सात वर्षे पालिकेला पीएमपीला दरमहा निधी द्यावा लागणार आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या साडेपाचशे बससाठी पालिकेलाच खर्च करावा लागणार आहे.
पीएमपीमध्ये पुणे महापालिकेचा ६० टक्के वाटा असल्याने त्या प्रमाणात दरमहा तत्वावर घेण्यात येणाऱ्या बससाठी निधी उपलब्ध करून देण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी मान्यता दिली. त्याशिवाय, पालिकेचा ताफ्यात साडेपाचशे एसी बस घेण्यात येणार असून, त्यामुळे संचलन तुटीत होणारी वाढही भरून देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या बससाठीच्या आर्थिक व्यवस्थेला मंजुरी देण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून रखडलेली बसखरेदीची प्रक्रिया आगामी काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या लक्षात घेता, सध्या पीएमपीच्या ताफ्यात उपलब्ध असलेल्या बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे, नव्याने १ हजार ५५० बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी, शंभर बस पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यामार्फत, तर नऊशे बस हप्तेबंद पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तर, साडेपाचशे एसी बस भाडेकरारावर घेण्याचे निश्चित झाले आहे.

बसचे पार्किंग अन् देखभालही होणार

पुणे महापालिकेच्या जकात नाक्यांच्या चार जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास सर्वसाधारण सभेने बुधवारी मान्यता दिली. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील सुमारे २१ एकर जागा पीएमपीला उपलब्ध होणार असल्याने बसच्या पार्किंग आणि देखभालीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या सर्व ठिकाणी अद्ययावत स्वरूपाचे डेपो विकसित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिका हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यापासून जकात नाक्यांच्या जागांचा वापर होत नव्हता. महापालिकेने शेवाळवाडी (सोलापूर रोड), भेकराईनगर (सासवड रोड), शिंदेवाडी (सातारा रोड), भूगाव (पौड रोड) आणि बालेवाडी (कात्रज-देहूरोड बायपास) या पाच जकात नाक्यांचा जागा पीएमपीला ११ महिन्यांच्या कराराने दिल्या होत्या. त्यापैकी, बालेवाडीची जागा वगळता इतर चारही जागा पीएमपीला ३० वर्षांसाठी भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजूर केला.
या जागा देतानाच, त्या ठिकाणी स्टॉल किंवा अतिक्रमण होऊ नये अशी सदस्यांची भावना होती. परंतु, पीएमपी स्वबळावर जागा विकसित करू शकणार नसल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. अखेरीस, पीएमपीच्या वापराशिवाय इतर वापरासाठी जागा देताना सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात यावी, अशा उपसूचनांसह या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिनाअखेरीला मोफत प्रवास

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून यापुढे दर महिन्याच्या अखेरच्या सोमवारी मोफत प्रवास करण्याची सुविधा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. आगामी काळात महापालिकेची होणारी निवडणूक लक्षात घेऊन सर्वसाधारण सभेने पुणेकरांना नववर्षाची भेट देऊ केली आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएमपीची सेवा महिन्यातून एकदा मोफत देण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागूल यांनी दिला होता. स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर बुधवारी सर्वसाधारण सभेने मोफत प्रस्तावावर मान्यतेची मोहोर उमटवली. त्यामुळे दर महिन्यातील अखेरच्या सोमवारी नागरिकांना शहराच्या कोणत्याही भागांत पीएमपी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. मोफत प्रवासाची सुविधा पुणेकरांना उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेला दर महिन्याला साधारणतः एक कोटी ७० लाख रुपये पीएमपीला द्यावे लागणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *