facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / अहमदनगर / भोजनासाठी रोज एक किमी पायपीट

भोजनासाठी रोज एक किमी पायपीट

नगर जिल्ह्यात सर्वाधिक आश्रमशाळा अकोले तालुक्यात असून त्यांची अवस्था आजारी पडलेल्या रुग्णासारखी आहे. कारंडी आश्रमशाळेची अशीच अवस्था असून १२ वर्षांपासून म्हणजे एक तपापासून करंडी गावातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी अनेक अडचणींना तोंड देत आहेत. इमारत पडलेली असून जेवणासाठी रोज एक किलोमीटर पायपीट करावी लागते. शाळेपासून एका वस्तीवर हे भोजनगृह असून मुलींना या रस्त्यावरून रोज जा-ये करावी लागत आहे.

आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांबाबत घडणाऱ्या घटना रोज उघडकीस येत असून या विद्यार्थ्याना सातत्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील करंडी ही शासकीय आश्रमशाळा राजूर प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू आहे. सरकारी अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविघांसाठी प्रत्येक शाळेला दरवर्षी कोट्यवधी रुपये देते; मात्र, अधिकारी या निधीचा कसा वापर करतात, यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ मिळत नाही. सरकारचा आदिवासी विभाग अनुसूचित जाती जमातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी नको तेवढा खर्च करीत आहे; मात्र, झारीतील शुक्राचार्यांमुळे हा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र करंडीच्या आश्रमशाळेच्या निमित्ताने पहायला मिळत आहे.

करंडी येथील आश्रमशाळेला स्वतःच्या मालकीची जागादेखील नाही. ही शाळा सध्या करंडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू आहे. शाळेला जागा कमी पडत असल्याने ग्रामपंचायतीचे गाळे भाडे तत्त्वावर घेतले गेले आहेत. तसेच मुलींना राहण्यासाठी वसतिगृह हे देखील भाड्याने घेतले आहे. एवढेच नव्हे तर मुलांना जेवणासाठी एक किलोमीटरचा प्रवास करून जेवण घ्यावे लागते. तेथेदेखील सुविधांची ऐशीतैशी स्थिती पहायला मिळाली.

या आश्रमशाळेत २३ शिक्षक, कर्मचारी आणि एकूण ११७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढा मोठा स्टाफ असतानादेखील सुविधांचे तीन-तेरा वाजले आहेत. या आश्रमशाळेचे अधीक्षक कापसे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मुलींच्या प्रभारी अधीक्षिका मेहेत्रे यांनी या आश्रमशाळेच्या सर्व त्रुटींची माहिती दिली. सरकारने घर तिथे शौचालय बांधण्याचे धोरण ठरवले आहे; मात्र, ही सुविधा सरकारी आश्रमशाळेत पाहायला मिळत नाही. शौचालयाची सुविधा नसल्यामुळे मुलींना रात्रीच्या वेळी अंधारत शेजारच्या डोंगरावर जावे लागते. अशी परिस्थिती जर शासकीय आश्रमशाळेची असेल तर त्या बंद पडल्या तरी काही वावगे ठरणार नाही.

कोट ः

शाळेला भौतिक सुविधा नाहीत तर इमारत झाली तर मुलींना संरक्षण मिळेल. इमारत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात पाणी, हिवाळ्यात थंडी यामुळे आम्हाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकाच भांड्यात सर्व जेवण करावे लागते. जेवणही निकृष्ट प्रकारचे असते. फळे, अंडी मिळत नाहीत. जेवणासाठी व नाश्त्यासाठी चार वेळा ये-जा करावी लागते. शौचालय नसल्याने मुलींना उघड्यावर शौचास जावे लागते.

– डी. पी. मेहेत्रे, प्रभारी अधीक्षिका

कोट ः

मागील १२ – १३ वर्षांपासून आश्रमशाळेला इमारत नाही. पडक्या खोल्यांमध्ये आश्रमशाळा भरते. जेवणाला एका वस्तीवर एक किलोमीटर पायी जावे लागते. २३ ऑगस्ट २००४ रोजी आश्रमशाळा सुरू होऊनही तत्कालीन मंत्री आमदार, मंत्री यांना विनंती करूनही अद्याप आश्रमशाळेला इमारत नाही. प्रशासनाने हा प्रश्न सोडविला नाही तर विद्यार्थी, पालक प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण करतील.

– चंद्रकांत गोंदके, सरपंच, करंडी

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *